Image Source:(Internet)
नागपूर :
शिवसेनेने (Shiv Sena) पूर्व विदर्भातील राजकीय समीकरणांमध्ये नवीन ऊर्जा ओतणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागपूरसह संपूर्ण प्रदेशातील उत्तर भारतीय समाजाशी थेट संपर्क वाढवण्यासाठी उत्तर भारतीय सेलच्या समन्वयकपदी उत्तर भारतीय चेहरा म्हणून सुमुख मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव संजय मोरे यांनी मिश्रा यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केले.
सुमुख मिश्रा यांची फायर ब्रँड नेते म्हणून ओळख-
उत्तर भारतीय समाजाची वाढती उपस्थिती आणि स्थानिक पातळीवर त्यांचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन शिवसेनेने ही महत्त्वाची जबाबदारी फायर ब्रँड नेते म्हणून ओळख निर्माण करणारे सुमुख मिश्रा यांच्या खांद्यावर सोपवली आहे. नागपूरमध्ये तसेच पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये युवक, महिला आणि कामगार वर्गाशी थेट संवाद साधत संघटन वाढवण्याचे काम ते करणार आहेत.
नियुक्तीपत्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या संघटनशैलीचा प्रभावी प्रचार करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच महिन्याच्या कामकाजाचा सविस्तर अहवाल बाळासाहेब भवन, मुंबई येथे सादर करण्याची सक्ती करण्यात आली आहे. यामुळे नेतृत्वाला थेट आढावा घेता येणार आहे.
नागपुरात उत्तर भारतीय नेतृत्वाला ताकद -
या नियुक्तीनंतर नागपूरमधील उत्तर भारतीय समाजाशी संवाद साधण्यासाठी पक्षाकडे अधिकृत चेहरा उपलब्ध झाला आहे. संघटन विस्ताराच्या प्रयत्नांना गती मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
पक्षश्रेष्ठींचे मानले आभार -
सुमुख मिश्रा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, तसेच पूर्व विदर्भ समन्वयक किरण पांडव यांचे आभार मानत पक्षवाढीसाठी झोकून देण्याचा निर्धार व्यक्त केला. राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार नरेंद्र भोंडेकर आणि आमदार कृपाल तुमाने यांच्यासोबत समन्वय साधत संघटनेचे काम मजबुत करण्याचा त्यांचा मानस आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्त्वांचे पालन करणार-
पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी निष्ठेने पाळणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांची ८० टक्के समाजसेवा आणि २० टक्के राजकारण ही तत्त्वे माझ्या कार्याची दिशा राहतील. हिंदुत्वाचा नारा घराघरात पोहोचवू,” अशी ठाम प्रतिक्रिया मिश्रा यांनी व्यक्त केली.
नागपूर आणि पूर्व विदर्भाच्या राजकीय घडामोडींमध्ये मिश्रा यांच्या नियुक्तीमुळे नवे समीकरण तयार होण्याची चर्चा सुरू झाली आहे.