परिणिती चोप्रा–राघव चड्ढा यांनी मुलाचे नाव केले जाहीर; ‘नीर’च्या सुंदर अर्थाने चाहत्यांची मनं जिंकली

19 Nov 2025 15:43:06
 
Parineeti Chopra Raghav Chaddha
 Image Source:(Internet)
नागपूर :
बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या घरी काही दिवसांपूर्वी पुत्ररत्नाचा जन्म झाला होता. या स्टार कपलने आपल्या नवजात मुलाचे नाव काय ठेवणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर जवळपास महिन्याभराने दोघांनी एका खास भावनिक पोस्टमधून आपल्या मुलाचे नाव जाहीर केले असून, हा क्षण चाहत्यांसाठी आनंदाचा ठरला आहे.
 
इन्स्टाग्रामवर टाकलेल्या फोटोंमध्ये परिणिती आणि राघव आपल्या लाडक्या मुलाच्या छोट्या पायांना प्रेमाने बिलगलेले दिसतात. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या मुलाचे नाव ‘नीर’ असल्याचे सांगितले. ‘नीर’ म्हणजे पाणी—शांतता, निर्मळता आणि पवित्रतेचे द्योतक. या नावाबरोबर त्यांनी संस्कृत ओवीही शेअर केली आहे:
 
“जलस्य रूपम्, प्रेमस्य स्वरूपम् – तत्र एव नीर” म्हणजेच “ज्याच्यात पाण्याची निर्मळता आणि प्रेमाची कोमलता आहे—तोच नीर.”
 
परिणितीने लिहिले आहे की, या छोट्या राजकुमाराच्या आगमनाने त्यांच्या आयुष्यात अपरिमित आनंद आणि पूर्णत्वाची भावना निर्माण झाली आहे. त्याच्या आगमनाने कुटुंबातील प्रत्येक क्षण अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण झाल्याचे तिने नमूद केले.
 
ही पोस्ट समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांकडून, बॉलिवूड कलाकारांकडून आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. ‘नीर’ या नावातील साधेपणा आणि अर्थपूर्णता पाहून नेटिझन्सही हे नाव मनापासून पसंत करत आहेत.
 
परिणिती आणि राघव यांच्या आयुष्यातील हा नवा अध्याय ‘नीर’च्या आगमनाने अधिक उजळला आहे.
Powered By Sangraha 9.0