Image Source:(Internet)
मुंबई :
गरजू आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांसाठी सुरू असलेल्या मोफत धान्य योजनेत (Free ration scheme) मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या व्यापक तपासणीत या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या अपात्र लोकांची संख्या प्रचंड असल्याचे समोर आले. त्यानंतर केंद्राने निर्णायक पाऊल उचलत 2.25 कोटी अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळले आहे.
यामध्ये अनेक चारचाकी वाहनमालक, जास्त उत्पन्न असलेले करदाते आणि काही कंपन्यांचे संचालक यांचा देखील समावेश असल्याचे उघड झाले आहे. इतकेच नव्हे तर मृत व्यक्तींची नावेही काही ठिकाणी रेशन कार्डवर कायम असल्याचे चकित करणारे वास्तव तपासात समोर आले.
केंद्रीय अन्न मंत्रालयाने आधार क्रमांक, उत्पन्नाची नोंद, वाहन रजिस्ट्रेशन, कुटुंबातील सदस्यांची माहिती यांसारख्या नोंदींची छाननी करून पात्र आणि अपात्रांची वर्गवारी केली. ओळख पटलेल्या व्यक्तींची यादी राज्यांना पाठवल्यानंतर त्यांच्या नावांची रेशन योजनेतून सफाई करण्यात आली. पुढेही ही पडताळणी सुरूच ठेवली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
देशभरात सध्या 81 कोटींपेक्षा जास्त लोक मोफत रेशनचा लाभ घेत आहेत. अंत्योदय कुटुंबांसाठी मिळणारे 35 किलो मोफत धान्य, तसेच प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी मिळणारे 5 किलो तांदूळ किंवा गहू यात कोणताही बदल होणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
मोफत रेशन योजनेतील गैरवापर रोखण्यासाठी आणि खऱ्या गरजूंपर्यंत धान्य पोहोचावे यासाठी केंद्राने केलेली ही मोठी कारवाई महत्त्वाची पावले मानली जात आहेत.