पीएम किसानचा २१वा हप्ता : महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकरी यादीतून वगळले; तुमचं नाव आहे का? जाणून घ्या

18 Nov 2025 14:35:31
 
PM Kisan Yojana
 Image Source:(Internet)
मुंबई :
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१वा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात पाठवण्याची तयारी केंद्र सरकारने पूर्ण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तब्बल १८ हजार कोटी रुपयांचा निधी लाभार्थ्यांना वितरित होणार असून दर शेतकऱ्याला २ हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे.
 
यापूर्वी पूरस्थितीचा धोका वाढल्यामुळे पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू–काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या खात्यात २१वा हप्ता आधीच जमा करण्यात आला आहे.
 
महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकरी अपात्र-
महाराष्ट्रातील पीएम किसान लाभार्थ्यांबाबत महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे. केंद्राने आधार, शिधापत्रिका आणि प्राप्तिकर माहितीच्या आधारे लाभार्थ्यांची पात्रता पडताळणी केली. या तपासणीत निकष पूर्ण न करणाऱ्या जवळपास २.५ लाख शेतकऱ्यांना यादीतून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये आपलं नाव अजूनही योजनेत आहे का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
 
पीएम किसानच्या यादीत नाव कसं तपासाल?
तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही, हे काही सोप्या स्टेप्सने तपासू शकता :
पीएम किसानची अधिकृत वेबसाइट उघडा — pmkisan.gov.in
होमपेजवरील “Beneficiary Status / Beneficiary List” पर्याय निवडा.
राज्य म्हणून महाराष्ट्र निवडा.
जिल्हा → तालुका → गाव क्रमाने निवडा.
Get Report वर क्लिक करा.
यानंतर तुमच्या गावातील लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल. त्या यादीत तुमचं नाव शोधू शकता.
 
महाराष्ट्रातील ९० लाख शेतकऱ्यांना मिळणार हप्ता-
या हप्त्यासाठी महाराष्ट्रातील ९० लाख ४१ हजार शेतकऱ्यांची नावे अंतिम यादीत आहेत. २१व्या हप्त्याची रक्कम १९ नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. याआधी २ ऑगस्ट २०२५ रोजी २०वा हप्ता वितरित करण्यात आला होता.
पीएम किसान योजना २०१९ मध्ये सुरू करण्यात आली असून आतापर्यंत २० हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे.
 
नमो शेतकरी महासन्मान निधीच्या पुढील हप्त्याकडे उत्सुकता-
राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत मिळणाऱ्या २ हजार रुपयांच्या पुढील हप्त्याची शेतकऱ्यांना आतुरतेने वाट पाहत आहेत. राज्याच्या कृषी विभागाकडून याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0