नागपूर महापालिका : प्रभाग २३ मध्ये तृतीयपंथीय राणी ढवळे भाजप तिकिटासाठी इच्छुक

17 Nov 2025 20:06:40
 
Rani Dhawale
 Image Source:(Internet)
नागपूर :
महापालिका निवडणुकांची चाहूल लागताच प्रभाग २३ मध्ये राजकीय समीकरणे नव्याने आकार घेऊ लागली आहेत. याच प्रभागातील सर्वसाधारण जागेसाठी तृतीयपंथीय समाजातील राणी ढवळे (Rani Dhawale) यांनी भाजपाकडून उमेदवारी मिळावी, अशी औपचारिक मागणी केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आपली इच्छा व्यक्त केल्याची माहिती पुढे आली आहे.
 
राणी ढवळे या किन्नर विकास महामंडळाशी संलग्न असून सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. भाजपात त्यांनी जवळपास दीड दशक काम केल्याचा दावा त्यांनी केला आहे. नव्या आरक्षण योजनेनुसार प्रभाग २३ मधील ‘ड’ ही जागा खुली ठेवण्यात आली असून याच जागेसाठी ढवळे यांनी दावा ठोकला आहे. २०१७ च्या निवडणुकीत या प्रभागातून भाजपचे नरेंद्र बोरकर विजयी झाले होते आणि नव्या आरक्षणानंतर बोरकर देखील पुन्हा तयारीला लागल्याची चर्चा आहे.
 
तृतीयपंथीय समाजालाही स्थानिक राजकारणात संधी मिळायला हवी, असा ठाम आग्रह राणी ढवळे व्यक्त करतात. छत्तीसगडमधील देशाच्या पहिल्या तृतीयपंथी महापौर मधू किन्नर यांच्या कार्यातून त्यांना प्रेरणा मिळाल्याचे त्या सांगतात.
 
भाजपकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया अद्याप सुरू नसली तरी राणी ढवळे यांच्या इच्छेमुळे प्रभाग २३ मधील राजकीय स्पर्धा रंगतील, अशी चिन्हे दिसत आहेत. सोमवारी त्या शहराध्यक्षांकडे आपले अर्जपत्र सादर करणार असून अंतिम निर्णय पक्षस्तरावरील बैठकीनंतर अपेक्षित आहे.
Powered By Sangraha 9.0