- कठोर नियमांमुळे मृतदेह भारतात आणणे अशक्य
Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
उमराह यात्रेला गेलेल्या भारतीय यात्रेकरूंच्या बसचा सौदी अरेबियात (Saudi Arabia) मोठा अपघात झाला असून यात तब्बल ४२ भारतीयांचा करुण मृत्यू झाला आहे. मक्का ते मदिना या मार्गावर प्रवास सुरू असताना बसची डिझेल टँकरला जोरदार धडक झाली. धडकेनंतर क्षणातच आग पसरली आणि काही सेकंदांतच संपूर्ण बस जळून खाक झाली. या भीषण आगीत महिलांसह अनेक लहान मुलांचाही मृत्यू झाला आहे. तेलंगणा आणि हैद्राबाद परिसरातील अनेक कुटुंबांवर या दुर्घटनेने शोककळा पसरली आहे.
सर्व यात्रेकरू उमराहची धार्मिक यात्रा पूर्ण करून मक्केतून मदिनाकडे जात होते. दुर्घटनेनंतर मृतदेह भारतात आणण्याची मागणी सातत्याने होत असली तरी सौदी अरेबियातील धार्मिक यात्रांशी संबंधित जुन्या कठोर नियमांनुसार यात्रेदरम्यान मृत्यू झाल्यास मृतदेह स्वदेशात पाठवण्यास परवानगी दिली जात नाही. प्रवासापूर्वी यात्रेकरूंनीही या नियमास संमती दिलेली असल्याने हा कायदेशीर अडथळा आता अधिक गंभीर बनला आहे.
आर्थिक मदतीबाबतही कुटुंबीयांपुढे संकट आहे. सौदी सरकार धार्मिक यात्रेदरम्यान झालेल्या दुर्घटनांसाठी कोणतीही नुकसानभरपाई देत नाही. त्यामुळे विमा आणि आर्थिक मदत मिळण्याचा एकमेव आधार भारतातून घेतलेल्या खासगी विम्यावरच अवलंबून आहे. अनेक कुटुंबांना आता संपूर्णतः विमा कंपन्यांच्या प्रतिसादाची वाट पाहावी लागणार आहे.
अपघातानंतर भारत सरकारने तत्काळ सौदी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून भारतीय दूतावासाने स्थानिक प्रशासनाशी समन्वय वाढवून ओळख आणि माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. या भीषण दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला असून कुटुंबीयांवर अपरिमित दु:खाचा डोंगर कोसळला आहे.