बिहार विजयाच्या दुसऱ्याच दिवशी भाजपाची कारवाई; माजी केंद्रीय मंत्र्याची सहा वर्षांसाठी हकालपट्टी

15 Nov 2025 20:11:53
 
R K Singh
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
बिहार (Bihar) विधानसभा निवडणुकीत एनडीएने विक्रमी विजय मिळवून २४३ पैकी २०० हून अधिक जागांवर बाजी मारली आहे. महाआघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर एनडीएचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच, भाजपाने मात्र आपल्या एका ज्येष्ठ नेत्यावर कठोर पाऊल उचलले आहे. माजी केंद्रीय मंत्री व आरा येथील माजी खासदार आर. के. सिंह यांना पक्षविरोधी भूमिकेमुळे सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
 
भाजपाची नोटीस – पक्षविरोधी कारवायांचा ठपका
पक्षाने जारी केलेल्या नोटीसमध्ये स्पष्ट म्हटले आहे की, आर. के. सिंह यांनी सातत्याने पक्षविरोधी विधानं करून संघटनेची प्रतिमा धोक्यात आणली आहे. त्यांच्या भूमिकेमुळे पक्षाचे नुकसान झाले असून, नोटीस मिळाल्यापासून आठ दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
२०१३ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केलेले सिंह हे २०१४ आणि २०१९ मध्ये आरा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना ऊर्जा राज्यमंत्री पद मिळाले होते. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
 
अदानी ऊर्जा प्रकल्पावरून वाढला तणाव
अलीकडच्या आठवड्यांत बिहारमधील २४०० मेगावॉटच्या भागलपूर (पिरपैंती) ऊर्जा प्रकल्पाबाबत सिंह यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता. हा प्रकल्प अदानी पॉवर लिमिटेडला देण्यात आला असून त्यात ६० हजार कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा त्यांनी सार्वजनिकरित्या केला. ६ रुपये प्रति युनिट या वाढीव दराने वीज खरेदी केल्यास सामान्य नागरिकांना मोठा फटका बसेल, अशी टीकाही त्यांनी केली होती.
 
त्यांच्या या विधानांमुळे एनडीएमध्ये मोठी खळबळ उडाली. काँग्रेस आणि भाकप (माले) नेत्यांनीही या मुद्द्यावरून एनडीएवर जोरदार टीका केली.
 
NOTA चं आवाहन, निवडणूक आयोगावरही टीका
सिंह यांनी गुन्हेगारी नोंदी असलेल्या उमेदवारांना नाकारण्याचे आवाहन करत मतदारांना NOTA हा पर्याय वापरण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी आपल्या ‘एक्स’ हँडलवर ऊर्जा प्रकल्पाशी संबंधित कागदपत्रेही पोस्ट केली होती. निवडणूक आयोगाने आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात अयशस्वी झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
 
आर. के. सिंह कोण?
– १९९० मध्ये आयएएस अधिकारी म्हणून काम करत असताना लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेला अटक करण्याचे आदेश अमलात आणणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होता.
 
– यूपीए सरकारमध्ये केंद्रीय गृहसचिव पदावर राहून त्यांनी मालेगाव आणि समझोता एक्सप्रेस स्फोट प्रकरणातील आरएसएस सदस्यांची नावे जाहीर करून मोठे वाद निर्माण केले होते.
 – २०१४ मध्ये भाजपात दाखल झाल्यानंतर त्यांनी सुशीलकुमार शिंदे, पी. चिदंबरम यांसारख्या काँग्रेस नेत्यांवर अनेक आरोप केले होते.
– नितीश कुमार यांच्या कार्यकाळात ते बिहारच्या रस्ते बांधकाम विभागाचे प्रधान सचिवही राहिले होते.
 
एनडीएच्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर भाजपाने अशा कडक कारवाईचा निर्णय घेतल्याने बिहारमध्ये नवीन राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Powered By Sangraha 9.0