महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी: काँग्रेसने केली उमेदवारांची घोषणा, अनेक जिल्ह्यांत युती !

14 Nov 2025 18:12:27
 
Congress
 Image Source:(Internet)
मुंबई :
आगामी महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने (Congress) आपल्या सर्व उमेदवारांची यादी अंतिम केली आहे. जिल्हानिहाय राजकीय समीकरणांचा विचार करून अनेक समविचारी पक्षांसोबत स्थानिक पातळीवर युती करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिळक भवन येथे दिली.
 
सपकाळ म्हणाले, राज्य निवडणूक समितीच्या दोन दिवसांच्या सलग बैठकीत उमेदवार निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली. प्रत्येक जिल्ह्याचे राजकीय स्वरूप भिन्न असल्याने, स्थानिक नेतृत्वाशी सविस्तर चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात आला. जागांच्या वाटपात स्थानिक समीकरणांना प्राधान्य देण्यात आले आहे.
 
१७ नोव्हेंबरपर्यंत नामांकन अर्ज-
राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीत एकूण ६,८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्ष पदांसाठी २ डिसेंबर रोजी ईव्हीएमद्वारे मतदान होणार आहे. ३ डिसेंबरला मतमोजणी होईल. नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
 
महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती-
या महत्त्वाच्या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, सह-प्रभारी बी.एम. संदीप, माजी मंत्री नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, वजाहत मिर्झा, प्रदेश सरचिटणीस (संघटना व प्रशासन) अ‍ॅड. गणेश पाटील, सिद्धार्थ हत्तीआंबीरे, सचिन नाईक आदी नेते उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0