कोल्हापुरात चित्तथरारक बचाव मोहीम; तब्बल काही तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्या जेरबंद!

13 Nov 2025 18:45:22
 
Kolhapur Leopard captured
 Image Source:(Internet)
कोल्हापूर :
कोल्हापूरच्या (Kolhapur) ताराबाई पार्क परिसरात आज सकाळी एक बिबट्या शिरल्याने मोठी खळबळ उडाली. हा बिबट्या महावितरण (MSEDCL) कार्यालयाच्या आवारातील वापरात नसलेल्या ड्रेनेज टँकमध्ये लपला होता. टँकच्या एका छिद्रातून त्याचा फक्त शेपटा दिसत असल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं.
 
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सर्वांनी मिळून बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्यासाठी योजना आखली. टँकच्या एका बाजूला जाळं टाकण्यात आलं तर दुसरीकडे लाकडी फळ्या लावून मार्ग बंद करण्यात आला.
 
दरम्यान, लाकडी फळी लावताच बिबट्या अचानक जोरात बाहेर झेपावला, मात्र जाळ्यात अडकल्याने त्याला पळता आलं नाही. वनविभागाच्या पथकाने तत्काळ त्याला बेशुद्ध करून सुरक्षितपणे पिंजऱ्यात ठेवले.
 
या बचाव मोहिमेदरम्यान कुणालाही दुखापत झाली नाही. काही तासांच्या थरारक प्रयत्नांनंतर अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आलं. या यशस्वी कारवाईबद्दल नागरिकांनी वनविभाग आणि पोलिसांचे कौतुक केले.
Powered By Sangraha 9.0