भाजपचा सर्वेक्षणाधारित तिकीट निर्णय; ‘जनतेचा विश्वास’च राहणार मुख्य निकष, बावनकुळे यांचा इशारा

13 Nov 2025 14:33:00
 
Chandrashekhar Bawankule
 Image Source:(Internet)
पुणे :
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) आपली निवडणूक तयारी जोरदारपणे सुरू केली आहे. उमेदवार ठरवताना आता कार्यकर्त्यांची लोकप्रियता आणि जनतेचा प्रतिसाद या घटकांवर भर दिला जाणार आहे.
 
राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात झालेल्या पदाधिकारी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. ते म्हणाले, “भाजपमध्ये कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे, पण तिकीट त्याच कार्यकर्त्यांना मिळेल ज्यांचा जनतेवर विश्वास आहे आणि ज्यांनी विकासकामांद्वारे आपली ओळख निर्माण केली आहे. पक्षाच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष, जनतेचा अभिप्राय आणि स्थानिक पातळीवरील प्रतिमा – हे तीन निकष उमेदवारी ठरवताना महत्त्वाचे ठरणार आहेत.”
 
बावनकुळे पुढे म्हणाले, “महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (आजीत पवार गट) या तिन्ही पक्षांचे संयुक्त मताधिक्य ५१ टक्क्यांपेक्षा अधिक असेल, अशी आमची खात्री आहे. नुकत्याच झालेल्या समन्वय बैठकीत सुनील तटकरे, उदय सामंत आणि शंभूराजे देसाई यांच्यासोबत सर्व पक्षांच्या ताकदीचे विश्लेषण करण्यात आले. सर्व मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण घेऊनच उमेदवारांची निवड केली जाणार आहे.”
 
भाजपच्या या सर्वेक्षणाधारित निर्णयामुळे पक्षात कार्यकर्त्यांमध्ये पारदर्शकतेचा संदेश गेला असून, जनतेच्या मतांवर आधारित तिकीटवाटपाची ही पद्धत इतर पक्षांसाठीही आदर्श ठरू शकते. आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही जनाधारित रणनीती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
Powered By Sangraha 9.0