Image Source:(Internet)
मुंबई :
दिवाळीनंतर (Gold) सोनं आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वी भाव वाढल्यानंतर आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. उलट चांदीच्या किमतींनी वाढ दाखवली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि दागिने घेणाऱ्यांसाठी हा महत्वाचा आर्थिक संकेत मानला जात आहे.
आजच्या व्यवहारात २४ कॅरेट सोन्याचा दर तब्बल ७८७ नी स्वस्त झाला असून, तो आता १,२३,३६२ प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. जीएसटीसह किंमत १,२७,०८२ इतकी आहे. दुसरीकडे, चांदीचा दर १,५९,६९७ प्रति किलो झाला आहे, म्हणजेच चांदीत सौम्य वाढ नोंदवली गेली आहे.
१७ ऑक्टोबर रोजी सोन्याने आपला सर्वोच्च दर गाठला होता, त्यानंतर सतत चढउतार होत राहिले. आजच्या घसरणीमुळे सोने आपल्या उच्चांकापेक्षा तब्बल ७,५१२ नी स्वस्त झाले आहे.
चांदीच्या दरात मात्र थोडी वाढ दिसून येते. जीएसटीविना चांदीचा दर १,५५,०४६ वरून २८६ नी वाढून १,५५,३३२ झाला आहे. या वर्षभरात चांदीत ६४,०२९ रुपयांची वाढ झाली आहे, तर सोनं अजूनही मागील वर्षाच्या तुलनेत ४७,६२२ नी महागलेले आहे.
सोन्याचे इतर प्रकारही आज स्वस्त झाले आहेत –
२३ कॅरेट सोने: ७८४ नी घसरून १,२२,८६८ प्रति १० ग्रॅम (जीएसटीसह १,२६,५५४)
२२ कॅरेट सोने: ७२० नी घसरून १,१३,००० प्रति १० ग्रॅम (जीएसटीसह १,१६,३९०)
१८ कॅरेट सोने: ५९० नी स्वस्त होऊन ९२,५२२ प्रति १० ग्रॅम (जीएसटीसह ९५,२९७)
तज्ज्ञांच्या मते, सध्याची ही घसरण अल्पकालीन असण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील डॉलर इंडेक्स, व्याजदरातील बदल आणि गुंतवणूकदारांची मागणी या घटकांवर पुढील दर अवलंबून राहतील. चांदीबाबत मात्र औद्योगिक वापर वाढल्याने ती काही काळ महाग राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान आजच्या सोन्या-चांदीच्या दरातील चढउतार हे आगामी आर्थिक प्रवृत्तीचे द्योतक मानले जात आहेत. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी दरांची सतत माहिती ठेवणे हितावह ठरेल.