- स्थानिक स्वराज्य निवडणुकीत रणनीती आखण्यासाठी भाजपकडून प्रमुख नियुक्ती
Image Source:(Internet)
नागपूर :
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपला मास्टरप्लॅन तयार करत राज्याचे महसूल मंत्री आणि पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Bawankule) यांना महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक प्रभारी म्हणून नेमले आहे.
हा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली. बैठकीस राज्यातील सर्व जिल्हा प्रभारी, संघटन मंत्री, महामंत्री आणि मंत्रीमंडळातील काही सदस्य उपस्थित होते. जवळपास तीन तास चाललेल्या या बैठकीत राज्यभरातील निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व पदाधिकार्यांना महायुतीला प्राधान्य देत एकत्रित रणनिती आखण्याचे निर्देश दिले.
प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती स्थापन- चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, महायुतीतील घटक पक्षांमध्ये संवाद आणि एकजूट राखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तीन मंत्र्यांची समन्वय समिती कार्यरत होईल.
या समित्यांमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (आ. पवार गट) या तीनही पक्षांतील प्रत्येकी एक मंत्री असेल.
बावनकुळे म्हणाले,महायुतीच्या घटकांमध्ये कोणताही मतभेद निर्माण होऊ नये, हे सुनिश्चित करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.”
त्यांनी विश्वास व्यक्त केला की महायुतीला ५१ टक्क्यांहून अधिक मते मिळून राज्यभरात दोन-तृतीयांश बहुमतासह विजय मिळवणे शक्य आहे.
सहयोगी पक्षांबाबत संयम राखण्याचे निर्देश-
बैठकीत उपस्थित सर्व नेत्यांना सहयोगी पक्षांवर टीका न करण्याचे आणि महायुतीच्या एकतेत बाधा येईल असे वक्तव्य टाळण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
भाजपने अधोरेखित केले की, राज्याच्या सर्व पातळ्यांवरील विजयासाठी महायुतीचा समन्वय आणि एकत्रित प्रयत्न हेच यशाचे गमक ठरणार आहे.