शरद पवार–अजितदादा हातात हात घालून मैदानात; चंदगडमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर घोषणा

10 Nov 2025 19:25:33
 
Sharad Pawar Ajit Pawar,
 Image Source:(Internet)
 
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा माहोल तापला असून, सर्व पक्षांकडून प्रचारयुद्धाची तयारी जोमात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये मोठी राजकीय हालचाल झाली आहे. दीर्घकाळापासून चर्चेत असलेला प्रश्न अखेर निकाली निघाला असून, शरद पवार (Sharad Pawar) गट आणि अजित पवार गट स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये एकत्र लढणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
 
काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाच्या महत्त्वाच्या बैठकीत भाजप वगळता इतर पक्षांसोबत निवडणूकपूर्व युतीसाठी तयार असल्याचे संकेत देण्यात आले होते. त्यानंतर या दोन राष्ट्रवादी गटांमध्ये मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणार का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत होता. अखेर आज या शंकेला पूर्णविराम मिळाला आहे.
 
दरम्यान रविवारी झालेल्या शरद पवार गटाच्या कोअर कमिटी बैठकीतही निवडणुकीसंबंधी धोरण ठरवण्यात आले. ज्या जागा ओबीसीसाठी राखीव आहेत, तिथे मूळ ओबीसींना प्राधान्य द्यावं, आणि ज्या ठिकाणी योग्य उमेदवार सापडत नाहीत, तिथे कुणबी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना उमेदवारी द्यावी, अशा सूचना शरद पवार यांनी खासदार व आमदारांना दिल्या.
 
याच दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगर पंचायतीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले आहेत. माजी आमदार राजेश पाटील आणि नंदाताई बाभुळकर हे एकत्रितपणे निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत. ही युती मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने साध्य झाली असून, चंदगडमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली.
 
या राजकीय घडामोडीनंतर राज्यभरात उत्सुकता वाढली आहे. चंदगडमधील ही युती आता अन्य ठिकाणीही पुनरावृत्त होईल का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पवार कुटुंबातील ही नवी एकजूट स्थानिक राजकारणाला नवा कलाटणी देणारी ठरू शकते.
Powered By Sangraha 9.0