Image Source:(Internet)
तिरुपती :
देशातील सर्वात श्रीमंत धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या तिरुपती (Tirupati) बालाजी मंदिरात लाखो भाविकांना दिल्या जाणाऱ्या लाडू प्रसादात बनावट तुपाचा वापर होत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सीबीआयच्या तपासात उत्तराखंडमधील एका डेअरीने मंदिर प्रशासनाला तब्बल ६८ लाख किलो भेसळयुक्त तूप पुरवल्याचे उघड झाले आहे.
तपासानुसार, भोले बाबा ऑर्गॅनिक डेअरी नावाच्या या कंपनीने २०१९ ते २०२४ या काळात सुमारे २५० कोटी रुपयांचे तूप टीटीडीला विकले. पण धक्कादायक म्हणजे, या कालावधीत कंपनीने दूध किंवा लोणी यांचे व्यवहारच केले नव्हते. तरीही प्रचंड प्रमाणात तूप तयार केल्याचे दाखवण्यात आले.
सीबीआयच्या अहवालानुसार, डेअरीचे मालक पम्मिल जैन आणि विपिन जैन यांनी बनावट कागदपत्रे तयार करून तूप उत्पादनाचा बनाव केला. त्यांनी खात्यांमध्ये फेरफार करून तूप उत्पादनाची खोटी आकडेवारी दाखवली.
या घोटाळ्यात सहभागी असलेल्या आरोपी अजय कुमार सुगंध याने कबुली दिली की त्याने डेअरीला मोनोडायग्लिसराइड्स आणि अॅसिटिक अॅसिड एस्टर ही रासायनिक पदार्थ पुरवले, जे औद्योगिक वापरासाठी असतात. या रसायनांचे मिश्रण करून बनावट तूप तयार करण्यात येत होते, जे नंतर लाडू प्रसाद बनवण्यासाठी वापरले गेले.
सीबीआयनुसार, जैन बंधूंनी या घोटाळ्यानंतरही थांबले नाही. वैष्णवी डेअरी (तिरुपती), मालगंगा डेअरी (उत्तर प्रदेश) आणि एआर डेअरी फूड्स (तामिळनाडू) अशा इतर नावांखाली तेच लोक तूप पुरवठा करत राहिले.
२०२२ मध्ये तक्रारी आल्यानंतर टीटीडीने भोले बाबा डेअरीला ब्लॅकलिस्ट केले, परंतु नवे नाव वापरून पुरवठा सुरूच राहिला. याच काळात प्राण्यांच्या चरबीचे मिश्रण करून बनावट तूप तयार केल्याचेही तपासात समोर आले आहे.
जुलै २०२४ मध्ये टीटीडीने भेसळयुक्त तूप आढळल्याने चार टँकर नाकारले होते, परंतु ते टँकर परत न पाठवता दुसऱ्या डेअरीकडे पाठवण्यात आल्याचे एफएसएसएआय आणि सीबीआयच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकारामुळे लाखो भक्तांची श्रद्धा डळमळली आहे. “भगवंताच्या प्रसादातही भेसळ,” या बातमीने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.तिरुपतीचा लाडू केवळ अन्न नव्हे, भक्तीचं प्रतीक आहे — आणि त्या श्रद्धेवरच या घोटाळ्याने घाव घातला आहे.