स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत स्वबळावरच लढाई; महसूल मंत्री बावनकुळे यांची घोषणा

10 Nov 2025 22:33:18
 
Bawankule
 
नागपूर :
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे (Elections) वेळापत्रक जाहीर होताच, राजकीय वातावरणात महायुतीच्या भविष्यातील रूपावर चर्चा उधाण पावली आहे. येत्या दोन महिन्यांत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत भाजपने आपली भूमिका स्पष्ट करत स्थानिक निवडणुका स्वतंत्रपणे, स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
बावनकुळे यांनी सांगितले की, "आमच्या कार्यकर्त्यांनी महायुतीतून लढण्याऐवजी स्वतंत्रपणे मैदानात उतरावे, अशी भावना व्यक्त केली होती. त्यामुळे आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार देत आहोत." नागपूरसह काही भागांत भाजप महायुतीशिवाय स्वतंत्र उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभा-विधानसभा निवडणुका युतीतून लढवल्यानंतर स्थानिक निवडणुका देखील युतीनेच लढवल्या जातील, असा अंदाज होता, पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “जिथे युती फायदेशीर ठरेल तिथेच युती करणार, नाहीतर स्वतंत्रपणे लढणार” असे सांगितल्याने राज्यातील राजकीय वातावरणात गोंधळ वाढला आहे.
नगर परिषद व नगर पंचायत निवडणुका जाहीर होताच भाजपकडून महायुती किंवा जागा वाटपाबाबत अजून ठोस चर्चा झालेली नाही, परंतु उमेदवारीसाठी सज्ज होण्याचा कार्य सुरू झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेही काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढण्याचे निर्देश दिले आहेत. तर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट स्थानिक पातळीवर इतर समविचारी पक्षांशी युती करून लढण्याचा विचार करत आहेत. काँग्रेसही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
Powered By Sangraha 9.0