Image Source:(Internet)
नागपूर :
राज्यातील शेतकऱ्यांच्या (Farmers) संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा झालेल्या चर्चेनंतर राज्यातील सर्व शेतकऱ्यांची ३० जूनपर्यंत संपूर्ण कर्जमाफी केली जाईल, अशी अधिकृत घोषणा केली.
या घोषणेनंतर आज नागपूर शहरात ‘प्रहार’ कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या उत्साहात विजय सोहळा साजरा करत आहेत. सर्वत्र “बच्चू कडू अमर राहो!”च्या घोषणा घुमत असून, शहरभर उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण पसरले आहे.
मंगळवारपासून नागपूर-हैदराबाद महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू होते. या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती आणि प्रशासनाने काही आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिलास्याचा प्रकाश उमटला.
आज बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर, अजित नवले आणि अॅड. वामनराव चटप हे मुंबईहून नागपूरला परतत असून, त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर आणि आंदोलनस्थळी प्रचंड गर्दी उसळली आहे. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
शेतकऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागणीची पूर्तता होण्याची चिन्हे दिसताच ग्रामीण भागात आनंदाची लाट पसरली आहे. शेतकरी संघटनांकडून सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, दिलेलं आश्वासन तातडीने प्रत्यक्षात उतरावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
आज सायंकाळी नागपूरमध्ये होणाऱ्या ‘विजय उत्सवा’त हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर शेतकऱ्यांच्या झुंजार लढ्याला मिळालेलं हे यश महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रासाठी नवा अध्याय ठरू शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.