रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; ऑनलाईन तिकिटाची तारीख आता मोफत बदलता येणार

08 Oct 2025 20:00:29
 
railway passengers Online ticket
 Image Source:(Internet)
नागपूर:
दिवाळी आणि छठ सणाच्या काळात प्रवाशांसाठी मोठा दिलासा! भारतीय रेल्वे (Railway) लवकरच ऑनलाइन बुक केलेल्या तिकिटांची तारीख बदलण्याची सुविधा सुरू करणार आहे. यामुळे प्रवाशांना तिकीट रद्द करून नवीन तिकीट बुक करण्याची गरज नाही; फक्त थेट प्रवासाची तारीख बदलता येईल.
 
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आयआरसीटीसीसह सर्व संबंधित एजन्सींना ही सुविधा लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत ही सुविधा फक्त ऑफलाइन तिकिटांसाठी उपलब्ध होती, परंतु लवकरच ऑनलाइन तिकिट धारकांसाठीही लागू होणार आहे. रेल्वे प्रशासन सध्या यावर काम करत असून प्रवाशांना लवकरच लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
 
सध्या, प्रवाशांना तिकीटाची तारीख बदलायची असेल, तर आधी तिकीट रद्द करून नवीन तिकिट घेणे आणि त्यासाठी शुल्क भरावे लागते. नवीन सुविधा सुरू झाल्यावर, प्रवासी तिकीट रद्द न करता थेट तारीख बदलू शकतील, ज्यामुळे वेळ आणि पैसे दोन्ही वाचतील.
 
सध्याचे तिकीट रद्द करण्याचे शुल्क:
एसी फर्स्ट क्लास / एक्झिक्युटिव्ह क्लास – २४० रुपये + जीएसटी
एसी २ टायर / फर्स्ट क्लास – २०० रुपये + जीएसटी
एसी ३ टायर / एसी चेअर कार / एसी ३ इकॉनॉमी – १८० रुपये + जीएसटी
स्लीपर क्लास – १२० रुपये
द्वितीय श्रेणी – ६० रुपये
 
ऑफलाइन तिकिटांसाठी नियम:
जर तिकिट कन्फर्म, आरएसी किंवा वेटलिस्ट असलेले असेल, तर प्रवासी ट्रेन सुटण्याच्या ४८ तास आधी तिकिट रद्द करून नवीन तारीख निश्चित करू शकतात. नवीन तारखेस रिक्त जागा उपलब्ध असणे आणि नवीन आरक्षण शुल्क भरणे आवश्यक आहे.
 
लवकरच ही सुविधा ऑनलाईन तिकिटांसाठीही लागू होणार असल्यामुळे प्रवाशांना अधिक सोयीसुविधा मिळणार आहेत.
Powered By Sangraha 9.0