नागपूर:
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार तोफ डागली आहे. सरकार शेतकऱ्यांना फसवत असून, निवडणूक आणि राजकीय लाभासाठी हजारो कोटींची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कडू म्हणाले, “शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची गोड गळे घालण्यात आली, पण प्रत्यक्षात एक रुपयाचंही मदत सरकारकडून मिळालेलं नाही. सरकारकडे निधी आहे, पण तो शेतकऱ्यांसाठी नव्हे; मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंना पराभूत करण्यासाठी परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पावर ७५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर शक्तीपीठ महामार्गासाठी तब्बल ८६ हजार कोटींचा खर्च केला जात आहे. पण शेतकऱ्यांसाठी मात्र सरकारकडे काहीच नाही,” अशी टीका त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले, “सत्ताधारी मंडळी सतत सांगतात की खजिना रिकामा आहे, पण राजकीय सोयीच्या ठिकाणी निधी ओतला जातो. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, ‘पैशांचे सोंग घेता येत नाही’, मग शपथविधीच्या दिवशी जेव्हा पहाटे सूर्योदयाच्या आधी तुम्ही तयार झाला होता, तेव्हा कोणत्या पैशांचं सोंग घेतलं होतं?” असा टोला बच्चू कडूंनी लगावला.
कडूंच्या म्हणण्यानुसार, सरकारला शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांची आणि बांधकाम व्यावसायिकांची काळजी जास्त आहे. “निवडणुकीच्या वेळी मात्र मतांसाठी लाडक्या बहिणींसाठी योजना काढल्या जातात, तेव्हा बजेट बिघडत नाही! पण शेतकऱ्यांसाठी पैसा खर्च करायचा म्हटलं की सरकारी तिजोरी रिकामी होते,” असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, “कापूस, सोयाबीन यांसारख्या पिकांना बाजारभाव नाही, उत्पादन खर्चही वसूल होत नाही. शेतकरी राबतो, पण त्याचा माल मातीमोल दराने विकावा लागतो. राज्यात शेतकऱ्यांसाठी बोलणारा एकही नेता उरलेला नाही. सगळे सत्तेच्या गोडीत हरवले आहेत.”
शेतकऱ्यांना आता संघटित व्हावे लागेल-
कडू यांनी स्पष्ट इशारा दिला की, “सरकारला आता जाग आणण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र यायला हवं. आम्ही शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणार आहोत. २८ ऑक्टोबरला नागपूरमध्ये मोठा लढा उभारणार असून, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी थेट सरकारला जाब विचारू,” असा इशारा त्यांनी दिला.शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलणारे आता उरले नाहीत, आणि सरकार मतांच्या राजकारणात गुंतले आहे, असा आरोप करीत बच्चू कडूंच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.