Image Source:(Internet)
मुंबई :
यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. धाराशिव, सोलापूर, बीड आणि अहमदनगर या भागांत मुसळधार पावसाने मोठे नुकसान केले. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उद्ध्वस्त झाले, शेतीचे आणि घरगुती वस्तूंचेही नुकसान झाले.
पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद आणण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून या कुटुंबांना मोफत जीवनावश्यक वस्तूंचं किट दिलं जाणार आहे. या किटमध्ये एकूण २५ वस्तू असतील आणि त्याची किंमत २१०० इतकी असेल. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून, मंजुरी मिळताच वाटपाला सुरुवात होणार आहे.
या दिवाळी किटमध्ये टूथपेस्ट, टूथब्रश, साबण, तेल, साखर, गहू, डाळ, चणे, गूळ, मेणबत्त्या यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश असेल. पूरग्रस्तांच्या घरात सणाचा आनंद आणि दिवाळीचा उजेड परतावा, यासाठी ही योजना राबवली जाणार आहे.
दरम्यान, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पंचनाम्यांची आणि आर्थिक भरपाईची प्रक्रिया सुरूच आहे. मात्र दिवाळीपूर्वी थोडासा दिलासा मिळावा, म्हणून हे किट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारचा उद्देश स्पष्ट आहे – “पूरानं अंधार दिला, पण सरकारनं दिवाळीचा प्रकाश पोहोचवायचाच आहे.”