अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नवं घर; मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

07 Oct 2025 16:40:34
 
Heavy rain affected cm fadnavis
 Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून मुसळधार पावसाने (Heavy rain) आणि महापुराने जनजीवन विस्कळीत केले आहे. अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली, तर शेतकऱ्यांचे पीक, जनावरे आणि घरं उद्ध्वस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा केली आहे.
 
सरकारने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ३१,६२८ कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजमधून शेतकऱ्यांना आर्थिक मदत, घरबांधणीसाठी सहाय्य, तसेच शेती आणि पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी निधी दिला जाणार आहे.
संपूर्णपणे घर गमावलेल्या कुटुंबांना नवं घर; आंशिक नुकसानग्रस्तांनाही मदत-
फडणवीस म्हणाले, अतिवृष्टीमुळे ज्यांची घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, अशा सर्व कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवं घर बांधण्यासाठी मदत मिळेल. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या घरांना आंशिक नुकसान झालं आहे, त्यांनाही घर दुरुस्तीसाठी आणि जनावरांचे गोठे पुनर्बांधणीसाठी मदत दिली जाईल.
 
जमीन, जनावरे आणि विहिरींसाठी आर्थिक सहाय्य-
पावसामुळे ज्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत, अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३.५ लाख रुपयांची मदत दिली जाईल. त्यापैकी ४७,००० रुपये रोख दिले जातील, तर उर्वरित रक्कम मनरेगा योजनेद्वारे मिळेल.
 
पूरामुळे विहिरींचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३०,००० रुपयांची विशेष मदत मिळणार आहे. जनावरांचा मृत्यू किंवा वाहून जाण्याच्या घटनांमध्ये प्रति पशू ३७,००० रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे.
 
पायाभूत सुविधांसाठी १०,००० कोटींची तरतूद-
राज्यातील पूरग्रस्त भागांतील रस्ते, पूल, वीजपुरवठा आणि सिंचन संरचनांच्या दुरुस्तीसाठी १०,००० कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी या संकटात खंबीर राहावे, सरकार त्यांच्या सोबत आहे. प्रत्येक नुकसानग्रस्तापर्यंत मदत पोहोचेल आणि कोणालाही वंचित राहू दिलं जाणार नाही.
Powered By Sangraha 9.0