शिवभोजन’नंतर ‘आनंदाचा शिधा’ही ठप्प? राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाटाची चर्चा!

06 Oct 2025 11:14:29

 
Anandacha Shidha Yojana Image Source:(Internet)

मुंबई :
राज्यातील लोकप्रिय कल्याणकारी योजनांवर पुन्हा एकदा बंदीचं सावट दिसू लागलं आहे. सणासुदीच्या काळात गरीब आणि सामान्य कुटुंबांना दिलासा देणारी ‘आनंदाचा शिधा’ योजना (Anandacha Shidha Yojana) यंदा ठप्प पडल्याचं चित्र आहे. गणेशोत्सवानंतर दिवाळीही काही दिवसांवर आली असली तरी या योजनेबाबत सरकारकडून कोणतीही हालचाल दिसत नाही. त्यामुळे ‘शिवभोजन थाळी’नंतर आता ‘आनंदाचा शिधा’ही बंद होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गरीब कुटुंबांना सणासुदीच्या काळात घरात गोडधोड करता यावं, यासाठी ‘आनंदाचा शिधा’ योजना सुरू करण्यात आली होती. फक्त 100 रुपयांत एक किलो चणाडाळ, साखर, रवा आणि एक लिटर तेल असा सणासुदीचा किट देण्यात येत असे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या किटचं वितरण थांबलं आहे.

2023 मध्ये गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव आणि दिवाळी या सणांदरम्यान या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ देण्यात आला होता. 2024 मध्येही राममंदिर प्राणप्रतिष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त लाभार्थ्यांना किट देण्यात आलं होतं. पण यंदा गणेशोत्सव आणि दिवाळीपूर्वी योजनेचा कोणताही ठसा उमटलेला नाही.

मराठवाडा, सोलापूर आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली असताना, ‘आनंदाचा शिधा’ तरी काहीसा दिलासा देईल अशी अपेक्षा होती. मात्र, अद्याप शासनाकडून कोणतीही घोषणा झालेली नाही.

दरम्यान, ‘महायुती’ सरकारच्या कार्यकाळात अनेक योजनांचा डंका पिटला गेला असला, तरी प्रत्यक्षात निधीअभावी अनेक योजना कोमात गेल्याची चर्चा आहे. ‘शिवभोजन थाळी’, ‘तीर्थाटन योजना’, ‘लाडकी बहीण योजना’ यांसह अनेक योजनांना निधीपुरवठा थांबल्याने त्या ठप्प झाल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी कोणतीही योजना बंद झालेली नसल्याचा दावा केला असला, तरी जमिनीवरील परिस्थिती वेगळं चित्र दाखवते. सध्या ‘सरकारी तिजोरी रिकामी’ असल्याच्या चर्चेला उधाण आलं असून, ‘आनंदाचा शिधा’ योजनेचं भवितव्यही आता अनिश्चिततेत लोंबकळतंय.

Powered By Sangraha 9.0