"पिंजरा’ चित्रपटातील नायिका संध्या शांताराम यांचे निधन; ९४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

04 Oct 2025 16:15:02
 
Sandhya Shantaram
 Image Source;(Internet)
मुंबई :
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी संध्या शांताराम (Sandhya Shantaram) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
 
संध्या या आपल्या नृत्यकौशल्यासाठी आणि देखण्या अभिनयासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांच्या अभिनयाने ‘पिंजरा’, ‘दो आंखें बारह हाथ’ आणि ‘झनक झनक पायल बाजे’ सारख्या चित्रपटांना अमरत्व प्राप्त झाले. त्यांच्या अंत्ययात्रा शनिवारी सकाळी १०.३० वाजता परळ येथील राजकमल स्टुडिओमधून निघेल, तर अंत्यसंस्कार शिवाजी पार्कजवळील वैकुंठधाम येथे होणार आहेत.
 
‘पिंजरा’मधील नर्तकीच्या भूमिकेने मिळवले अमरत्व-
‘पिंजरा’ हा मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक अविस्मरणीय चित्रपट मानला जातो. एका शिक्षक आणि तमाशा फडातील नर्तकीच्या प्रेमकथेवर आधारित या चित्रपटात संध्या शांताराम यांनी नायिकेची भूमिका साकारली होती. त्यांच्या अभिनयाची आणि नृत्याची आजही प्रेक्षकांच्या मनावर छाप आहे.
 
व्ही. शांताराम यांच्याशी झाले तिसरे लग्न-
प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी आपल्या आयुष्यात तीन विवाह केले होते. संध्या या त्यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. दुसऱ्या पत्नी जयश्री यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर अवघ्या एका महिन्यांत त्यांनी संध्या यांच्याशी विवाह केला होता.
 
अभिनय कारकिर्द आणि योगदान-
संध्या यांनी जरी फारसे चित्रपट केले नसले तरी त्यांच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर अमिट ठसा उमटवला. ‘दो आंखें बारह हाथ’, ‘झनक झनक पायल बाजे’, ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ यांसारख्या चित्रपटांत त्यांनी प्रभावी भूमिका साकारल्या. मात्र, ‘पिंजरा’मधील त्यांची भूमिका ही त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील शिखर मानली जाते.
 
संध्या शांताराम यांचं निधन हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक मोठं नुकसान आहे. त्यांची कलाकृती आणि नृत्यकला येणाऱ्या पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहील.
Powered By Sangraha 9.0