Image Source:(Internet)
नागपूर :
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवताना नागपूर-हैदराबाद महामार्गावर झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी मोठं पाऊल उचललं आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनात महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता. त्यामुळे बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर, वामनराव चटप, रविकांत तुपकर यांच्यासह सुमारे २,५०० आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कर्जमाफी, सातबारा कोरा आणि शेतकऱ्यांना न्याय या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलकांनी २८ ऑक्टोबरपासून महामार्गावर ठिय्या मांडला. प्रशासनाकडून आंदोलनासाठी केंद्रीय कापूस खरेदी केंद्राजवळील मैदान दिलं असतानाही आंदोलकांनी थेट रस्त्यावर उतरत वाहतुकीला पूर्ण अडथळा आणला. परिणामी, ३० तासांहून अधिक काळ महामार्गावर गाड्यांचा ताफा अडकून पडला आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
हिंगणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. आंदोलकांवर बेकायदेशीर जमाव जमवणे, वाहतूक अडवणे, पोलिसांना विरोध करणे आणि सार्वजनिक शांती भंग करणे यांसारख्या विविध कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या अहवालानुसार, काही नेत्यांनी उत्तेजक भाषणं देऊन जमावाला उचकवलं, ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती.
शेतकऱ्यांच्या बाजूने आक्रमक भूमिका घेत बच्चू कडू यांनी सांगितलं की,आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतोय. मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच राहील.
मात्र, आता या चक्काजाम आंदोलनानंतर या सर्व नेत्यांवर कायदेशीर संकट ओढवलं आहे. पोलिसांकडून पुढील काही दिवसांत आणखी काही आंदोलकांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी या कारवाईचा निषेध नोंदवला असून, “सरकार शेतकऱ्यांचा आवाज दडपते आहे” असा आरोप त्यांनी केला आहे. नागपूरमध्ये झालेल्या या आंदोलनानंतर राज्यभरात शेतकरी असंतोष पुन्हा वाढताना दिसत आहे.