Image Source:(Internet)
मुंबई :
नोव्हेंबर (November) महिन्यात बँकांशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे आर्थिक काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी सुट्ट्यांचे नियोजन जरूर करा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नोव्हेंबर 2025 साठी प्रसिद्ध केलेल्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार देशभरातील बँका एकूण १३ दिवस बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये राष्ट्रीय, प्रादेशिक तसेच शनिवार-रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे. मात्र या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये एकाच दिवशी लागू होणार नाहीत. प्रत्येक राज्यात स्थानिक सण आणि परंपरांनुसार बँका वेगवेगळ्या दिवशी बंद राहतील.
या महिन्याच्या सुरुवातीला कर्नाटकात कन्नड राज्योत्सव आणि उत्तराखंडमध्ये इगास-बागवाल साजरे केले जातील, त्यामुळे त्या राज्यांतील बँका बंद राहतील. त्यानंतर गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा आणि रास पौर्णिमा या उत्सवांच्या निमित्ताने दिल्ली, मुंबई, नागपूर, कोलकाता, जयपूर, रांची, लखनौ, श्रीनगर, भुवनेश्वर, चंदीगडसह अनेक प्रमुख शहरांमधील बँका बंद राहतील. शिलाँगमध्ये नोंगक्रेम नृत्य आणि मेघालयात वांगाला महोत्सव साजरे होणार असल्याने तिकडील बँकांनाही सुट्टी असेल. दुसरा व चौथा शनिवार तसेच सर्व रविवारी देशभरातील बँका नेहमीप्रमाणे बंद राहतील.
ग्राहकांनी या कालावधीत होणाऱ्या सुट्ट्यांचा विचार करून आपल्या बँकिंग व्यवहारांचे नियोजन करावे. रोख रकमेची गरज असल्यास एटीएममधून आधीच पैसे काढावेत. मात्र, डिजिटल बँकिंग, यूपीआय, नेट बँकिंग आणि मोबाइल अॅप्सच्या सेवा या कालावधीतही सुरळीतपणे सुरू राहतील, त्यामुळे ऑनलाइन व्यवहारात कोणतीही अडचण येणार नाही.