Image Source:(Internet)
मुंबई:
महाराष्ट्र सरकारने आयात-निर्यात प्रक्रियेला अधिक डिजिटल आणि पारदर्शक बनवण्यासाठी आजपासून इलेक्ट्रॉनिक बॉण्ड (Electronic Bonds) प्रणाली सुरू केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे कागदी बॉण्डवर अवलंबून राहण्याची गरज संपणार आहे.
पूर्वीच्या कागदी बॉण्डमध्ये फसवणुकीच्या घटनाही वारंवार घडत होत्या. ई-बॉण्ड प्रणालीमुळे कस्टम अधिकारी आणि ग्राहकांची ई-स्वाक्षरी वापरून व्यवहारांची तत्काळ पडताळणी करता येईल, ज्यामुळे फसवणुकीवर प्रभावी नियंत्रण राहणार आहे.
या नव्या उपक्रमात National E-Governance Services Limited (NeSL) आणि National Informatics Centre (NIC) यांच्या तांत्रिक सहकार्याने संपूर्ण प्रक्रिया डिजिटल केली जात आहे. ई-बॉण्ड प्रणालीमुळे व्यवहार वेगवान, सुरक्षित आणि पारदर्शक होतील. कायदेशीर मुद्रांक शुल्कही थेट ऑनलाइन भरण्याची सोय राहणार आहे.
उद्योग आणि व्यापारी वर्गासाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरणार असून, व्यवहारातील वेळ व खर्च दोन्ही बचत होतील आणि कागदपत्रांची गुंतागुंतही कमी होईल.