खोकल्याच्या औषधाने घेतला 11 चिमुकल्यांचा बळी; देशभरात खळबळ!

03 Oct 2025 16:14:58
 
Cough medicine
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
साधारणपणे लहान मुलांना खोकला (Cough) किंवा ताप झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने कफ सिरप दिलं जातं. मात्र हेच औषध आता मृत्यूचं कारण ठरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे घडलेल्या या घटनांमध्ये तब्बल 11 बालकांचा मृत्यू झाला असून देशभरात खळबळ माजली आहे.
 
घटना कुठे घडल्या?
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात 9 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर राजस्थानातील भरतपूर आणि सीकर जिल्ह्यात प्रत्येकी एका मुलाचा बळी गेला आहे. पीडित कुटुंबीयांचा आरोप आहे की त्यांच्या मुलांना “बनावट कफ सिरप” दिल्याने त्यांचा जीव गेला.
 
प्राथमिक चौकशीत उघड झालेले धक्कादायक निष्कर्ष –
सिरपची गुणवत्ता तपासलीच गेली नव्हती, तसेच तयार करताना वापरलेल्या कच्च्या मालाची नोंदही नव्हती. औषधांच्या पॅकेजिंग आणि लेबलिंगमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या आहेत.
 
गाड्यांच्या ब्रेक फ्ल्यूडमध्ये वापरला जाणारा केमिकल मुलांच्या औषधात –
राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने (NCDC) तपासासाठी 23 नमुने गोळा केले. त्यापैकी 3 नमुन्यांमध्ये डायइथिलीन ग्लायकॉल (DEG) आणि एथिलीन ग्लायकॉल (EG) हे रसायन सापडले. हेच रसायन गाड्यांच्या ब्रेक फ्ल्यूड आणि कुलंटमध्ये वापरले जाते.
 
सरकारची तात्काळ कारवाई –
या प्रकरणानंतर राजस्थान सरकारने मुख्यमंत्री मोफत औषध योजना अंतर्गत कफ सिरपचे वितरण थांबवले आहे. तसेच मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात दोन औषधांच्या ब्रँड्सवर बंदी घालण्यात आली आहे.
 
देशभरात भीतीचं वातावरण –
या घटनेनंतर सर्वत्र भीतीचं सावट पसरलं आहे. नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी औषध कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ज्या औषधांवर उपचाराची आशा ठेवली जाते, त्याच औषधांमुळे मृत्यू होत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
Powered By Sangraha 9.0