राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची राफेलमधून ऐतिहासिक भरारी; २० मिनिटांत पाहिली भारतीय वायुसेनेची ताकद!

29 Oct 2025 14:35:44
 
Draupadi Murmu
 Image Source:(Internet)
अंबाला :
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी आज हरियाणातील अंबाला हवाई तळावरून राफेल या अत्याधुनिक लढाऊ विमानातून ऐतिहासिक उड्डाण घेत देशाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला. राष्ट्रपती म्हणून हा त्यांचा पहिलाच असा अनुभव असून, त्यांनी या प्रसंगी फायटर पायलटसाठीचा विशेष फ्लाइट सूट परिधान केला होता.
 
अंबाल्यात आगमनानंतर वायुसेनेच्या जवानांकडून राष्ट्रपती मुर्मू यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर त्यांनी राफेल विमानातून जवळपास २० मिनिटांची रोमांचक हवाई सफर केली. विशेष म्हणजे, या विमानाचं संचालन एक महिला पायलटने केलं, ज्यामुळे हा क्षण अधिकच गौरवशाली ठरला.
 
ऐतिहासिक परंपरेचा पुढचा टप्पा
या आधी २००९ साली तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील यांनी सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानातून उड्डाण घेऊन इतिहास घडवला होता. तसेच माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनीही वायुसेनेच्या विमानातून उड्डाण करत भारतीय सामर्थ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. आता राष्ट्रपती मुर्मू यांनी त्या परंपरेला नव्या युगात पुढे नेलं आहे.
 
या वेळी वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी तसेच वरिष्ठ संरक्षण अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रपती मुर्मू यांनी यावेळी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेल्या जवानांचा विशेष सन्मान केला.
 
या कार्यक्रमादरम्यान अंबाला वायुसेना तळावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. राष्ट्रपतींच्या या दौऱ्यामुळे संपूर्ण तळावर उत्साहाचे वातावरण पसरले होते.
Powered By Sangraha 9.0