Image Source:(Internet)
मुंबई :
भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज आणि चाहत्यांचा लाडका ‘हिटमॅन’ रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटमध्ये चमकला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत अप्रतिम कामगिरी करत रोहितने आयसीसीच्या वनडे फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत पहिलं स्थान मिळवलं आहे.
रोहितने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर शुभमन गिल याला मागे टाकलं आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या गुणांकनात रोहितचे ७८१ रेटिंग गुण नोंदवले गेले आहेत, तर गिल आणि अफगाणिस्तानचा इब्राहिम झदरान अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘हिटमॅन’ची धडाकेबाज खेळी-
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रोहितने तुफानी फॉर्म दाखवत फलंदाजीत सर्वांना मागे टाकलं. पहिल्या सामन्यात तो अपयशी ठरला असला तरी दुसऱ्या सामन्यात त्याने दमदार अर्धशतक ठोकले आणि तिसऱ्या सामन्यात शतक झळकावून भारताला मालिकाविजय मिळवून दिला.
त्याने या मालिकेत एकूण २०२ धावा, सरासरी १०१, आणि फलंदाजीत सातत्य दाखवून ‘नंबर वन’ स्थान मिळवलं.
वयाच्या ३८व्या वर्षी रचला नवा इतिहास-
रोहितने या कामगिरीसह आणखी एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो आता ३८ वर्षे १८२ दिवसांच्या वयात वनडे क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. १८ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या रोहितसाठी हे यश करिअरमधील एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे.
भारतातील पाचवा ‘नंबर वन’ फलंदाज-
रोहित शर्मा हा वनडे क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळवणारा भारताचा पाचवा खेळाडू ठरला आहे. त्याआधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि शुभमन गिल या चार खेळाडूंनी हा बहुमान मिळवला होता.
आता ‘हिटमॅन’ रोहित शर्माने या यादीत आपलं नाव नोंदवत भारतीय क्रिकेटचा आणखी एक सुवर्ण अध्याय लिहिला आहे.