आनंदवार्ता;लग्नसराईपूर्वी सोनं झालं स्वस्त; दरात मोठी घसरण!

29 Oct 2025 16:44:44
 
Gold becomes cheaper
 Image Source:(Internet)
जळगाव :
दिवाळीनंतर सोन्याच्या (Gold) बाजारात थंडी पडली आहे. काही आठवड्यांपूर्वी विक्रमी पातळीवर पोहोचलेले दर आता घसरू लागले असून, लग्नसराईच्या हंगामात खरेदीदारांसाठी हा दिलासा देणारा बदल ठरतोय. जळगावच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या भावात मोठी घसरण नोंदली गेली आहे.
 
गेल्या २४ तासांत सोन्याच्या दरात तब्बल ४,००० ची घसरण झाली आहे. जळगावमधील २४ कॅरेट सोन्याचा दर १,२२,५०० वरून १,१८,५०० प्रति १० ग्रॅमपर्यंत खाली आला आहे. काही दिवसांपूर्वी हेच सोनं १.३५ लाखांच्या उच्चांकावर पोहोचलं होतं. मागील दहा दिवसांपासून दरांमध्ये सतत घट होत असल्याने सराफा बाजारात खरेदीचा माहोल निर्माण झाला आहे.
 
देशातील प्रमुख बाजारपेठांमध्येही सोन्याचे भाव कमी झाले आहेत. बुलियन असोसिएशनच्या माहितीनुसार, सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर १,२०,३८० प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेटचा १,१०,३४८, तर १८ कॅरेटचा ९०,२८५ रुपये इतका आहे. त्याचबरोबर चांदीचेही भाव कोसळले असून, एक किलो चांदीचा दर १,४६,३०० वर आला आहे.
 
आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकन डॉलरची मजबुती, अर्थव्यवस्थेतील सकारात्मक संकेत आणि नफावसुलीच्या लाटेमुळे सोन्याच्या किमतींवर दबाव आला आहे. अमेरिका-चीन व्यापार तणावात शिथिलता आल्याने आणि भू-राजकीय वातावरण स्थिर झाल्याने गुंतवणूकदारांचा कल आता शेअर बाजारासारख्या जोखमीच्या गुंतवणुकीकडे वाढला आहे.
 
तज्ज्ञांच्या मते, केंद्रीय बँकांकडून सुरू असलेली सोन्याची खरेदी आणि जागतिक अस्थिरतेमुळे येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरांना काहीसा आधार मिळू शकतो.
 
लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर खाली आल्याने दागिने घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही वेळ सोनं खरेदी करण्याची सर्वोत्तम संधी ठरत आहे.
Powered By Sangraha 9.0