बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे चार महामार्ग ठप्प; नागपूर परिसरातील जनजीवन विस्कळीत!

29 Oct 2025 11:28:38
 
Bachchu Kadu protest
 Image Source:(Internet)
नागपूर :
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी छेडलेल्या ‘चक्काजाम’ आंदोलनाचा फटका नागपूर आणि परिसरातील जनतेला मोठ्या प्रमाणात बसला आहे. नागपूर-वर्धा, नागपूर-अमरावती, नागपूर-रायपूर आणि जबलपूर-हैदराबाद हे चार प्रमुख महामार्ग पूर्णपणे ठप्प झाले असून, १५ तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प आहे. हजारो वाहनं अडकून पडली असून प्रवाशांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत.
 
गेल्या रात्रीपासून नागरिकांना गाड्यांमध्येच रात्र काढावी लागली आहे. काहींनी लेकरांना हातात घेत पायीच प्रवास सुरू केला आहे. आउटर रिंग रोडवर लांबलचक ट्रॅफिक जाम झाल्याने वाहनांच्या रांगा कित्येक किलोमीटरपर्यंत पसरल्या आहेत. एसटी बसेस, खासगी गाड्या, ट्रक आणि मालवाहतूक वाहनं थांबवण्यात आल्याने संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
कोंडीत अडकलेल्या महिलांनी बच्चू कडूंच्या आंदोलनावर रोष व्यक्त केला आहे. "शेतकऱ्यांसाठी लढताय हे योग्य आहे, पण आम्हीही कष्टकरीच आहोत. आमच्याच जगण्यात अडथळा का आणता?" असा थेट सवाल त्यांनी केला. अनेकांनी सांगितले की, "आमचं सरकारशी काही देणंघेणं नाही, पण या आंदोलनामुळे आमचंच आयुष्य विस्कळीत झालं आहे."
 
भक्ती देशपांडे या महिलांच्या वडिलांची बायपास सर्जरी झाल्यानंतर त्या शुअरटेक हॉस्पिटलमध्ये भेटायला जात होत्या. मात्र वर्धा महामार्गावरील आंदोलनामुळे त्या आणि त्यांच्या कुटुंबातील तीन महिला व लहान लेकरं तब्बल १४ तास रुग्णालयात अडकून पडली. जेवण-पाण्याची सोय नव्हती, मोबाईल नेटवर्क बंद होतं, त्यामुळे अखेर त्यांनी पायीच प्रवास सुरू केला. दोन किलोमीटर चालत आउटर रिंग रोडवर पोहोचून त्या पुढे हुडकेश्वरकडे निघाल्या.
 
या चक्काजाममुळे बाजारपेठा, उद्योग आणि आवश्यक वस्तूंची वाहतूकही ठप्प झाली आहे. ट्रकचालक आणि प्रवासी उपाशीपोटी महामार्गावर अडकले आहेत. काही चालकांनी सांगितले की काल सायंकाळपासून काहीच खाल्लं नाही, आता सहनशक्ती संपत चालली आहे.
 
प्रहार संघटनेने स्पष्ट केले आहे की मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस यंत्रणा प्रयत्नशील आहे. मात्र आंदोलकांची गर्दी आणि महामार्गांवरील ताण यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणणे प्रशासनास कठीण ठरत आहे.
Powered By Sangraha 9.0