भाजप नेत्या नवनीत राणा यांना बलात्कारासह जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत गुन्हा दाखल

29 Oct 2025 18:19:27
 
BJP leader Navneet Rana
 Image Source:(Internet)
अमरावती :
माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांना पुन्हा एकदा गंभीर धमकी मिळाल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जीव घेण्याची आणि सामूहिक बलात्काराची धमकी देणारे पत्र त्यांच्या अमरावती येथील कार्यालयात प्राप्त झाले आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
ही धमकीची चिठ्ठी हैदराबादहून स्पीड पोस्टद्वारे पाठवण्यात आली असल्याचे समोर आले आहे. पत्रात नवनीत राणा यांच्याविषयी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषा वापरली गेली असून, त्यात त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देण्यात आला आहे.
 
पत्र मिळताच नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक मंगेश कोकाटे यांनी तत्काळ राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे. धमकीचे पत्र कोणाकडून पाठवले गेले, त्यामागे हेतू काय, आणि त्यात वापरलेले शब्द नेमके कोणत्या कारणाने लिहिले गेले. याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
 
या प्रकरणामुळे अमरावतीत तसेच राज्यभरात चांगलीच खळबळ माजली आहे. नवनीत राणा यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याबाबतही विचार सुरू केला आहे.
Powered By Sangraha 9.0