Image Source:(Internet)
अमरावती :
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि शेतकरी नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी ‘महा एल्गार’ ट्रॅक्टर मोर्चा घेऊन अमरावतीहून नागपूरकडे रवाना झाले आहेत. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा मोठा आंदोलनात्मक उपक्रम राबवण्यात आला आहे.
या मोर्चाच्या सुरुवातीला ग्रामीण भागात ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव, घोषणाबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांचे स्वागत केले. ठिकठिकाणी महिला, शेतमजूर आणि तरुणांची मोठी गर्दी दिसली. मेंढपाळ समाज देखील आपल्या मेंढ्यांसह या आंदोलनात सामील झाला असून, त्यामुळे हे केवळ शेतकऱ्यांचे नव्हे तर संपूर्ण ग्रामीण जनतेचे प्रतिनिधित्व करणारे आंदोलन ठरले आहे.
अमरावती ते नागपूर आंदोलनाचा मार्ग-
हा ट्रॅक्टर मोर्चा अमरावती–वर्धा मार्गे नागपूरकडे जात आहे. सोमवारी रात्री मोर्चाचे सुकळी (जि. वर्धा) येथे मुक्कामाचे नियोजन करण्यात आले असून, बच्चू कडू याठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर मंगळवारी सकाळी मोर्चा नागपूरकडे रवाना होईल, अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाकडून देण्यात आली आहे.
सरकारला दिला खुला इशारा-
आंदोलनाची सुरुवात करताना बच्चू कडू म्हणाले, “शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ होईपर्यंत मी माझ्या गावात परतणार नाही. सरकारने आमच्या मागण्या तातडीने मान्य केल्या नाहीत, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.”
त्यांनी आरोप केला की, सरकारने यापूर्वी दिलेली कर्जमाफीची आश्वासने केवळ कागदावरच राहिली आहेत. काही महिन्यांपूर्वी अमरावती येथे केलेल्या आठ दिवसांच्या उपोषणावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्याचं सरकारनं लेखी आश्वासन दिलं होतं, मात्र प्रत्यक्षात कोणतीही कृती झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये पोहोचल्यावर हा मोर्चा सरकारविरोधात जोरदार घोषणा देऊन शेतकऱ्यांचा आवाज अधिक तीव्र करणार आहे.