राज्यातील २८ महापालिकांच्या निवडणुकांची लगबग; ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडतीचा शुभारंभ

28 Oct 2025 17:37:38
 
Election Commission
 Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील प्रमुख २८ महानगरपालिकांच्या (Municipalities) निवडणुकांचा कार्यक्रम अखेर निश्चित झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) आरक्षण सोडतीचा तपशीलवार कार्यक्रम जाहीर करताच स्थानिक राजकारणात चैतन्य संचारले आहे. या कार्यक्रमानुसार ११ नोव्हेंबर रोजी प्रारूप आरक्षणाची सोडत काढण्यात येणार असून, २ डिसेंबरला अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहे. यानंतर कोणत्या प्रभागातून कोणासाठी आरक्षण ठरणार हे स्पष्ट होईल.
 
आरक्षण सोडतीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर-
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, ११ नोव्हेंबर रोजी सर्व संबंधित महानगरपालिका आयुक्त आरक्षण सोडत काढतील. याच दिवशी प्रभागांची मर्यादा, नकाशे आणि प्रारूप आरक्षण सार्वजनिक केले जाईल. नागरिकांना हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी ११ ते १८ नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली आहे.
 
प्राप्त झालेल्या हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर आयुक्त २५ नोव्हेंबरपर्यंत आपला अंतिम अहवाल आयोगाकडे सुपूर्द करतील. त्यानंतर २ डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण राजपत्रात प्रकाशित करण्यात येईल. याच वेळी आगामी निवडणुकांचे स्वरूप आणि राजकीय समीकरणांची दिशा स्पष्ट होईल.
 
तत्पूर्वी ३० ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आरक्षण सोडतीची बैठक जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत पार पडणार आहे.
 
कोणासाठी किती आरक्षण?
या सोडतीत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीय (OBC) घटकांसाठी आरक्षित जागांचे निर्धारण केले जाईल. यासोबतच महिलांसाठीचे आरक्षण देखील या प्रक्रियेत निश्चित केले जाणार आहे. ही आरक्षण प्रणाली चक्राकार पद्धतीने राबवली जाणार असून, मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्व २८ महापालिका यात सहभागी आहेत.
 
राजकीय पार्श्वभूमी आणि तयारीचा महत्त्वाचा टप्पा
उच्च न्यायालयाने २०२६ पूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर ही प्रक्रिया गतीमान झाली आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारयादींच्या फेरतपासणीबाबत स्पष्टता दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना हिरवा कंदील मिळाला आहे.
 
प्रभाग रचना आणि सीमांकनावरील काही राजकीय वाद सध्या सुरू असले तरी, ११ नोव्हेंबरच्या प्रारूप सोडतीनंतर राजकीय पक्षांना उमेदवार ठरवण्यासाठी दिशा मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आता निवडणुकीच्या रंगात रंगण्यास सुरुवात झाली आहे.
Powered By Sangraha 9.0