- ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’
- अभिनेत्री प्राजक्ता कोळी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात
Image Source:(Internet)
मुंबई।
झिम्मा, झिम्मा २ आणि फसक्लास दाभाडेच्या यशानंतर निर्माती क्षिती जोग आणि लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे या लोकप्रिय जोडीच्या ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ (Krantijyoti Vidyalaya Marathi Medium) या आगामी चित्रपटाची तारीख जाहीर झाली आहे. नुकतीच सोशल मीडियावर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करत व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आता मराठी शाळा पुन्हा भरणार! असं म्हणत हा चित्रपट १ जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी शाळांची घटती संख्या, मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व आणि मराठी भाषेबद्दलचा गर्व या विषयांचा मनोरंजक तरीही हृदयस्पर्शी पद्धतीने घेतलेला वेध म्हणजे ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’. या चित्रपटात मराठी कलाकारांची दमदार फळी झळकणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर या सर्वांसोबत अभिनेत्री प्राजक्ता कोळी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे.
मनोरंजनाच्या माध्यमातून जनजागृतीचा प्रयत्न
चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “ या चित्रपटाचा विषय माझ्या अगदी मनाजवळचा आहे. आपल्या मराठी शाळा म्हणजे आपली ओळख. या शाळांमधूनच अनेक पिढ्या घडल्या, अनेक नामवंत मंडळी तयार झाली. पण आज मराठी शाळा कमी होत चालल्या आहेत आणि त्यांचं महत्त्व घटत चाललं आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटातून आम्ही या विषयावर मनोरंजनाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय याचा मला खूप आनंद आहे आणि माझ्या याआधीच्या चित्रपटांवर प्रेक्षकांनी जितकं प्रेम केलं तितकंच ते याही चित्रपटावर करतील याची खात्री आहे.” क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ येत्या १ जानेवारी २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.