Image Source:(Internet)
नागपूर :
एमआयडीसी परिसरात कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर पतीने (Husband) पत्नीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. पत्नीचे परपुरुषाशी संबंध असल्याचा संशय मनात घर करून बसलेल्या पतीने संतापाच्या भरात तिचा जीव घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी किशोर शंकर प्रधान (३१) आणि त्याची पत्नी रिंकी किशोर प्रधान (२३) हे नागपूरच्या पंचशील नगर परिसरात वास्तव्यास होते. रिंकीचा एका करण नावाच्या व्यक्तीशी संबंध असल्याचा संशय किशोरला होता. या संशयावरून दोघांमध्ये वारंवार भांडणं होत असत. पतीकडून वारंवार समज दिल्यानंतरही रिंकी करणशी संपर्कात असल्याचे सांगितले जाते.
रविवारी दुपारी सुमारास १.३० वाजताच्या सुमारास, किशोरने रिंकीला पुन्हा मोबाईलवर करणशी बोलताना पाहिलं. संताप अनावर होऊन त्याने जवळ पडलेलं लोखंडी फावडं उचलून रिंकीच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. तत्काळ किशोरने तिला लता मंगेशकर रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. उपनिरीक्षक संजय बन्सोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी किशोर प्रधान विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.