Image Source:(Internet)
बुलढाणा :
बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील अंधेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. अंधेरा आणि अंचरवाडी दरम्यानच्या जंगलात दोन लहान जुळ्या मुलींचे विघटित मृतदेह आढळले असून, या मुलींचा मृत्यू त्यांच्या पित्यानेच घडवून आणल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल शेषराव चव्हाण (वाशिम जिल्हा) असे आरोपीचे नाव आहे. पत्नीशी झालेल्या तीव्र वादानंतर त्याने संतापाच्या भरात आपल्या दोन निष्पाप मुलींना जंगलात नेऊन धारदार हत्याराने त्यांचा जीव घेतला. ही घटना २१ ऑक्टोबर रोजी घडल्याचे समोर आले आहे.
यानंतर आरोपीने शनिवारी स्वतः पोलीस ठाण्यात येऊन गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने जंगलात शोधमोहीम राबवून दोन्ही बालिकांचे मृतदेह हस्तगत केले.
घटनेनंतर स्थानिक परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये या अमानुष कृत्याबद्दल तीव्र संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून, ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
या निर्दयी घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरला आहे. एका वडिलांनीच आपल्या लेकरांचा घात केल्याची बातमी ऐकून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.