Image Source:(Internet)
नागपूर :
श्रद्धा आणि आस्थेचा अखंड संगम असलेला छठ (Chhat) महापर्व नागपुरात उत्साहात साजरा होत आहे. आज (सोमवार) सायंकाळी अंबाझरी तलावाच्या घाटावर व्रतधारक महिलांकडून अस्ताचल सूर्याला पहिला अर्घ्य दिला जाणार आहे. या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं असून सर्वत्र “छठी मइया की जय!” या जयघोषांचा गजर सुरू आहे.
उत्तर भारतीय सभा आणि छठ पूजा समितीकडून यंदाच्या सणासाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री, विदर्भ अध्यक्ष डी. बी. सिंह आणि जिल्हाध्यक्ष रामप्रताप शुक्ला यांनी सांगितलं की,छठ हा केवळ सण नाही, तर तो आपल्या श्रद्धा, संस्कार आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचं प्रतीक आहे.
समितीचे अध्यक्ष राकेश सिंह आणि कार्याध्यक्ष विवेक पांडे यांच्या नेतृत्वाखाली तलावाच्या किनाऱ्यावर निःशुल्क पूजाघाट उभारण्यात आले आहेत. व्रतींना अर्घ्य देताना अडचण येऊ नये म्हणून पाण्यात हवा भरलेले सुरक्षा ट्यूब्स लावण्यात आले आहेत.
सुरक्षा आणि शिस्तबद्धतेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त, मायक्रोफोनद्वारे सूचना व्यवस्था, तसेच स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भक्त आणि व्रतींसाठी खास सोयी :
घाटापर्यंत लाल गालिचा
श्रद्धाळूंवर पुष्पवृष्टी
व्रतींसाठी कपडे बदलण्याची सोय
निःशुल्क पूजनसामग्री आणि पूजाघाट
सुरक्षेसाठी सतत घोषणा प्रणाली
अंबाझरी तलाव परिसर सायंकाळी हजारो भक्तांनी गजबजणार असून सूर्यास्ताच्या वेळी छठी मइयांच्या आराधनेचा सोहळा नागपूरकरांसाठी भक्तीचा अनोखा अनुभव ठरणार आहे.