Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
सर्वोच्च न्यायालयात नेतृत्वबदलाची वेळ जवळ आली आहे. विद्यमान सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई (Bhushan Gavai) हे 23 नोव्हेंबर 2025 रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर देशाला नवा सरन्यायाधीश मिळणार असून, या प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. परंपरेनुसार, कार्यरत सरन्यायाधीशच आपल्या उत्तराधिकाऱ्याचे नाव केंद्र सरकारकडे अधिकृतरीत्या सुचवतात.
समोर आलेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती भूषण गवई यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. भूतान दौऱ्यावर असताना बोलताना त्यांनी सांगितले की, “केंद्र सरकारकडून पुढील सरन्यायाधीशासाठी शिफारस करण्याबाबत मला पत्र प्राप्त झाले आहे. मी रविवारी दिल्लीत पोहोचणार असून सोमवारी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची औपचारिक शिफारस करेन.”
न्यायमूर्ती सूर्यकांत हे हरियाणातील हिसार येथील रहिवासी असून ते एका साध्या शिक्षक कुटुंबातून आले आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील शासकीय शाळेतच झाले. त्यांनी 1981 मध्ये हिसार येथून पदवी आणि 1984 मध्ये रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी हरियाणाचे महाधिवक्ता म्हणून काम पाहिले असून नंतर हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. सध्या ते राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत.
भूषण गवई यांच्या निवृत्तीनंतर 24 नोव्हेंबर 2025 रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील, अशी अधिकृत शक्यता व्यक्त केली जात आहे. या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयात नव्या नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू होणार असून न्यायालयीन वर्तुळात या निर्णयाचे स्वागत होत आहे.