नागपुरात अवकाळी पावसाची हजेरी; सकाळपासून संततधार सुरूच

25 Oct 2025 23:00:43
- हवामान खात्याने २८ ऑक्टोबरपर्यंत 'यलो अलर्ट' जारी

Unseasonal rains Continuous downpourImage Source:(Internet) 
नागपूर:
उपराजधानी नागपुरात (Nagpur) शनिवारी सकाळपासूनच हवामानाने अचानक पलटी घेतली. आकाशात दाट ढग दाटून आले आणि सकाळी सुमारे नऊच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील तापमानात घट झाली असली, तरी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
 
हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यासाठी २५ ते २८ ऑक्टोबरदरम्यान यलो अलर्ट जारी केला असून, या काळात विजांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार सरींची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे.
 
शुक्रवारी सायंकाळीच शहरात हलकी रिमझिम सुरू झाली होती, तर शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला. दुपारपर्यंत सतत सरी कोसळत राहिल्याने रस्त्यांवर पाणी साचले आणि वाहतुकीवरही परिणाम झाला.
 
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या दमट वाऱ्यांबरोबरच दाबाच्या कमी पट्ट्याच्या निर्मितीमुळे हवामानात हा बदल दिसून येत आहे. मान्सून परत गेल्यानंतरही पावसाची ही हालचाल "पोस्ट-मॉन्सून अ‍ॅक्टिव्हिटी" म्हणून ओळखली जाते.
 
या अवकाळी पावसामुळे तापमानात मोठी घसरण झाली असून, हवेत गारवा आणि गारठा जाणवू लागला आहे. नागरिकांना उकाड्यातून आणि प्रदूषणातून काहीशी सुट मिळाली असली, तरी शेतकरी वर्गासाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरत आहे. आधीच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून सावरायचं असतानाच या अनपेक्षित पावसाने त्यांची अडचण अधिक वाढवली आहे.
Powered By Sangraha 9.0