Image Source:(Internet)
नागपूर:
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे घडलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या घटनेबाबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून, त्यांनी या प्रकरणाला समाजासाठी “लाजिरवाणे” असे संबोधले आहे. तायवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून सखोल चौकशी करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बबनराव तायवाडे म्हणाले की, “आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली असताना, ओबीसी समाजातील अनेक मुले आणि मुली शिक्षण, वैद्यक, अभियांत्रिकी आणि प्रशासन क्षेत्रात मोठ्या पदांवर पोहोचली आहेत. ही अभिमानास्पद बाब आहे. पण याच काळात एक तरुण डॉक्टर केवळ मानसिक छळामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलते, ही अत्यंत वेदनादायक गोष्ट आहे.”
तायवाडे यांनी प्रश्न उपस्थित केला की, “त्या तरुण डॉक्टरला आत्महत्येपर्यंत कोण पोहोचवले? कोणत्या कारणामुळे तिला नोकरीच्या काळात असा मानसिक ताण सहन करावा लागला? या सर्वांचा शोध लागणे गरजेचे आहे.”
ओबीसी महासंघाचे अध्यक्ष म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने या प्रकरणात एसआयटी गठित करून स्वतंत्र तपास सुरू करावा. दोषींना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणालाही असे अमानुष कृत्य करण्याचे धाडस होणार नाही.”
तायवाडे पुढे म्हणाले की, “गावातील एक साधी मुलगी डॉक्टर झाली, हे आपल्या समाजासाठी प्रेरणादायक आहे. पण तिच्यासारख्या तरुणांनी जर अन्याय, छळ किंवा दबावामुळे आपले आयुष्य संपवावे लागत असेल, तर हे आपण मुळीच सहन करणार नाही. ओबीसी समाज तिच्या न्यायासाठी लढेल, तोपर्यंत लढेल.