कफ सिरपमुळे २६ बालकांचा मृत्यू; भाजपाला औषध कंपन्यांकडून कोट्यवधींच्या निधीचा काँग्रेसचा आरोप

25 Oct 2025 23:26:56
 
26 children die due to cough syrup
 Image Source:(Internet)
भोपाल :
मध्य प्रदेशात चिमुकल्यांचा जीव घेणाऱ्या कफ सिरपकांडानं (Cough syrup) राजकीय वादंग पेटवलं आहे. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी भाजपावर थेट हल्लाबोल करत, औषध कंपन्यांकडून पक्षाला कोट्यवधी रुपयांची देणगी मिळाल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटलं की, ज्या कंपन्यांच्या सिरपमुळे मुलांचे मृत्यू झाले, त्या कंपन्यांवर सरकार कारवाई करत नाही, कारण त्याच कंपन्यांनी भाजपाला ९४५ कोटींची निवडणूक देणगी दिली आहे.
 
दिग्विजय सिंह यांनी भोपाळमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, २ सप्टेंबरपासून आतापर्यंत २६ निष्पाप मुलांचा मृत्यू या कफ सिरपच्या सेवनामुळे झाला आहे. या सिरपमध्ये डायएथलीन ग्लाइकॉलचं प्रमाण तब्बल ४८.६ टक्के आढळलं असून, सुरक्षित मर्यादा केवळ ०.०१ टक्के आहे. त्यांनी सवाल केला की, “जेव्हा हे औषध विषारी असल्याचं स्पष्ट झालं आहे, तेव्हा आरोग्य मंत्री अद्याप पदावर का कायम आहेत?”
 
त्यांनी पुढे आरोप केला की, “भाजपाला निधी देणाऱ्या ३५ औषध कंपन्या दर्जाहीन औषध तयार करतात. पण या कंपन्यांना सत्ताधाऱ्यांकडून संरक्षण मिळाल्यामुळे कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही.” दिग्विजय सिंह यांनी या कंपन्यांविरोधात गुन्हे नोंदवून संबंधित अधिकार्‍यांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 
घटनेचा मागोवा-
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये एकाच औषध कंपनीच्या कफ सिरपमुळे अनेक मुलांचे मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी श्रीसन फार्मास्युटिकल्स कंपनीचा मालक गोविंदनाथन रंगनाथन याला विशेष तपास पथकाने (SIT) अटक केली आहे. तसेच संबंधित डॉक्टर आणि औषध निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
 
या घटनेनंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप–प्रत्यारोपांचा भडका उडाला असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. निष्पाप मुलांच्या मृत्यूमुळे जनतेत सरकारविरोधात तीव्र असंतोष दिसून येत आहे.
Powered By Sangraha 9.0