Image Source:(Internet)
मुंबई :
जागतिक बाजारात सोनं (Gold) आणि चांदीच्या किमतीत सतत घट होत असल्यामुळे भारतातील बाजारातही मोठ्या प्रमाणात घसरण होण्याची शक्यता आहे. गुरुवार, २३ ऑक्टोबर रोजी ही घसरण अधिक स्पष्टपणे दिसून येऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
एमसीएक्सवर आधीच घट-
१७ ऑक्टोबर २०२५ रोजी एमसीएक्सवर सोनं आणि चांदीच्या किमतीत मोठी घट नोंदवली गेली होती. त्या दिवशी चांदी प्रति किलो सुमारे २०,००० रुपये आणि सोनं प्रति १० ग्रॅम सुमारे ४,००० रुपये घसरले होते. गेल्या दोन दिवसांपासून जागतिक बाजारात सतत घट होत असल्याने ही घसरण आणखी वाढण्याची शक्यता आहे.
१२ वर्षांतली सर्वात मोठी घसरण-
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, मंगळवारी सोन्याचे दर ६.३% नी आणि चांदीचे ७.१% नी घसरले. बुधवारीही पाच वर्षांतील सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली, ज्यामागे व्यापारी नफ्याची विक्री कारणीभूत ठरली.
जागतिक बाजारात स्थिती-
लंडन ट्रेडिंगमध्ये सोन्याचे दर ४०९६-४१०० डॉलर प्रति औंसवर स्थिर झाले आहेत, तर चांदीचे दर ४८ डॉलरपर्यंत घसरले आहेत. जागतिक स्तरावर झालेल्या या घसरणीमुळे भारतातही भाव घटण्याची शक्यता आहे.
दिवाळीनंतरची परिस्थिती-
सणानंतर सोन्याची मागणी कमी झाल्याने भावात घट झाल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे म्हणतात, “गेल्या चार महिन्यांत सोन्याचे दर प्रति औंस ३,३०० डॉलरवरून ४,४०० डॉलरपर्यंत वाढले. त्यामुळे या स्तरावर घसरण अपरिहार्य होती.”
गुंतवणूकदारांसाठी सल्ला-
सोनं किंवा चांदीमध्ये गुंतवणूक केलेल्यांनी सध्या संयम दाखवणे किंवा घसरणीचा फायदा घेऊन खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. भारतीय बाजारात सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम १.३ लाख रुपयांवरून सुमारे १.२८ लाख रुपयांपर्यंत घसरले आहेत, तर चांदीच्या किमतीत सुमारे १२% नी घट झाली आहे.