महायुतीचा पालिका निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरला; कुठे एकत्र लढणार तर कुठे स्वबळाचा नारा?

22 Oct 2025 16:25:14
 
formula for the Mahayuti
 Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यात येत्या काही आठवड्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Elections) पार पडणार आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे या निवडणुका प्रचंड प्रतिष्ठेच्या आणि सत्ता समीकरण बदलवणाऱ्या ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
 
महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुका संघटितपणे लढवण्याचा संकेत दिला असला, तरी स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी स्वबळावर लढण्याची मागणी पुढे येत आहे. काही शहरांतील पदाधिकारी “आमच्या बळावर विजय शक्य आहे” असा आत्मविश्वास व्यक्त करत आहेत. त्यामुळे महायुतीचे घटक पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी  हे सर्वत्र एकत्र राहणार का, की स्वतंत्र मार्ग स्वीकारणार, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
 
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. येथे तिन्ही पक्ष भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युती होणार आहे. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर मैदानात उतरणार, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
 
ठाणे महापालिकेबाबत मात्र अद्याप चर्चेला अंतिम रूप आलेले नाही. “ठाण्यात एकत्र लढता येईल का, यावर चर्चा सुरू आहे. जिथे विरोधक मजबूत आहेत, तिथे आम्ही महायुती म्हणून उतरणार,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
 
दरम्यान, महाविकास आघाडीकडूनही स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत अजून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार का, आणि त्यामुळे निवडणुकीचे समीकरण कसे बदलेल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0