अतिवृष्टीसह पुरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचा हात; आजपासून खात्यात जमा होणार रक्कम!

18 Oct 2025 11:14:50
 
farmers affected by heavy rains
 Image Source:(Internet)
मुंबई :
सप्टेंबर महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टी (Heavy rains) आणि महापुरामुळे ३३ जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पिके, जनावरे आणि शेतीचे साधनसामग्री वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. शासनाकडून सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करून अहवाल मिळाल्यानंतर आजपासून (१८ ऑक्टोबर) बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
 
बीड, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, बुलडाणा, अमरावती, हिंगोली, परभणी, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. काही भागात पाण्याचा पूर ओसंडून वाहिल्याने शेतकऱ्यांच्या पिकांसह साठवलेले उत्पादनसुद्धा वाहून गेले. राज्य सरकारने दिवाळीपूर्वी मदत देण्याचे आश्वासन दिले होते, आणि अखेर धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ती अंमलात आणली जात आहे.
 
शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कृषी आणि मदत विभागाचे अधिकारी पंचनामे व अहवाल अंतिम करण्याच्या कामात गुंतले होते. त्यानुसार दोन हेक्टरपर्यंतचे नुकसान केंद्राच्या ‘एनडीआरएफ’ निधीतून तर त्यापेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान राज्याच्या ‘एसडीआरएफ’ निधीतून भरून काढले जाणार आहे.
 
शासनाकडून पुष्टी-
“अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा सर्वसमावेशक अहवाल शासनाकडे पाठवला गेला आहे. दोन हेक्टरपर्यंतचे आणि त्यावरील नुकसान या दोन्ही प्रकारचे तपशील वेगळे सादर करण्यात आले आहेत. मदतीचा निधी शक्य तितक्या लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचेल, अशी माहिती सोलापूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली.
 
नुकसानाचे चित्र-
बाधित जिल्हे: ३३
एकूण नुकसानग्रस्त क्षेत्र: ५२.३९ लाख हेक्टर
एकूण बाधित शेतकरी: ६९.२० लाख
भरपाईसाठी अपेक्षित निधी: अंदाजे ६,५०० कोटी रुपये
 
ऑनलाईन याद्यांची प्रक्रिया वेगाने-
पंचनामे सादर झाल्यानंतर जिल्हास्तरावर बाधित शेतकऱ्यांच्या याद्या, त्यांच्या बँक खात्यांसह, ऑनलाइन प्रणालीवर अपलोड करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल अधिकाऱ्यांना यासाठी सूचना दिल्या असून, ज्या भागातील याद्या पूर्ण झाल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून थेट रक्कम जमा होणार आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळावा, यासाठी सरकारकडून ही मदत वेळेत पोहोचवण्याची तयारी सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0