लखनौ :
उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनौमध्ये (Lucknow) आज ब्राह्मोस एरोस्पेस युनिटमधून सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या पहिल्या संचाला हिरवा झेंडा दाखवला गेला. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या रक्षामंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानसाठी कठोर इशारा दिला.
ही युनिट डिसेंबर २०२१ मध्ये स्थापन झाली, तर औपचारिक उद्घाटन ११ मे २०२५ रोजी पार पडले. केवळ पाच महिन्यांत युनिटने पहिलं उत्पादन यशस्वीपणे पूर्ण करून भारताच्या संरक्षण उद्योगात नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. या युनिटचे उद्दिष्ट दरवर्षी ८० ते १०० ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा उत्पादन आहे. हा प्रकल्प उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरमधील सहा नोड्सपैकी एक असून, विशेषतः लखनौमध्ये विकसित करण्यात आला आहे.
स्वदेशी लष्करी सामर्थ्याची प्रतीकं
रक्षामंत्र्यांनी कार्यक्रमात सांगितले, "ब्रह्मोस आता फक्त एक क्षेपणास्त्र नाही, तर भारताच्या स्वदेशी लष्करी सामर्थ्याचे प्रतीक बनले आहे. यात पारंपारिक वॉरहेड, प्रगत मार्गदर्शन प्रणाली आणि सुपरसॉनिक वेग यांचा संगम आहे, ज्यामुळे ते जगातील सर्वोत्तम क्षेपणास्त्रांमध्ये मोडते. ब्रह्मोस आता लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी महत्त्वाचा आधार आहे आणि नागरिकांमध्ये आत्मविश्वास व अभिमान वाढवतो."
ते पुढे म्हणाले, "ऑपरेशन सिंदूर फक्त सुरुवातीचा अनुभव होता. लखनौतील ब्रह्मोस युनिट दाखवते की भारत आता फक्त आयात करणारा देश नाही, तर आधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाचा निर्माता देश आहे. ऑपरेशन सिंदूरमधील यश हे स्पष्ट करते की ही क्षेपणास्त्रे केवळ प्रयोग नव्हेत, तर प्रात्यक्षिक सामर्थ्याचे प्रतीक आहेत. पाकिस्तानच्या प्रत्येक इंच जमिनीवर ब्रह्मोसची पोहोच आहे. भारतासाठी विजय हा एक नियम आहे, घटना नाही."
रोजगार आणि आर्थिक वाढ
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, लखनौतील ब्रह्मोस युनिट फक्त लष्करी सामर्थ्याचा पुरावा नाही तर उत्तर प्रदेशच्या औद्योगिक प्रगतीचे प्रतीक आहे. लखनौ आता फक्त सांस्कृतिक शहर नसून तंत्रज्ञानाचे केंद्र बनले आहे. युनिटने देशाची सुरक्षा वाढवली आहे तसेच शेकडो तरुणांना रोजगार दिला आहे. ब्रह्मोस युनिटने आतापर्यंत ४० कोटींचा जीएसटी महसूल निर्माण केला आहे आणि येत्या काळात हा आकडा २०० कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.