Image Source:(Internet)
मुंबई :
धनत्रयोदशीच्या (Dhanteras) शुभदिनी सोन्याच्या भावाने पुन्हा एकदा उंच भरारी घेतली आहे. सणासुदीच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत तब्बल ३६०० रुपयांची वाढ झाली असून, चांदीनेही आपला कल वरच्या दिशेने दाखवला आहे. चांदीच्या भावात प्रति किलो ७०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
धनत्रयोदशीला सुवर्ण खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे आज बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी अपेक्षित आहे. सोन्या-चांदीच्या मागणीत झालेल्या वाढीचा आणि जागतिक बाजारातील चढ-उतारांचा परिणाम थेट भावांवर दिसून आला आहे.
MCX आणि IBJA वरील आजचे दर-
मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर आज 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमला 1,25,957 इतका झाला आहे. मागील व्यवहाराच्या तुलनेत या दरात सुमारे 312 ची वाढ झाली आहे.
तर इंडिया बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशन (IBJA) नुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 1,30,874 प्रति 10 ग्रॅम इतका पोहोचला आहे. म्हणजेच एका दिवसात 3,627 ची उसळी नोंदवली गेली आहे.
दिल्ली सराफा बाजारातसुद्धा सोन्याचा भाव किंचित वाढून 1,32,400 प्रति 10 ग्रॅम झाला आहे. कालच्या तुलनेत केवळ 10 ची वाढ दिसली आहे.
चांदीतही तेजीचा माहोल-
चांदीच्या बाजारात दोन दिवसांच्या मंदीनंतर पुन्हा वाढ दिसून आली. MCX वर चांदीचा दर 1,57,300 प्रति किलो इतका झाला असून, तो 696 ने वाढला आहे.
तर IBJA वर चांदीचा दर 1,71,275 प्रति किलो इतका झाला असून, तो 425 ने वाढला आहे.
सणासुदीचा हंगाम आणि जागतिक संकेत अनुकूल-
कमोडिटी तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता आणि भारतात सुरु असलेल्या सणासुदीच्या खरेदीच्या लाटेमुळे सोन्या-चांदीच्या किमतींना आधार मिळत आहे.
सणांच्या खरेदीमुळे मागणी वाढत असल्याने पुढील काही दिवसांतही किमतींमध्ये वाढ सुरू राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
धनत्रयोदशीच्या या शुभ मुहूर्तावर सुवर्णखरेदीला पुन्हा एकदा मोठी गती मिळाली असून, बाजारपेठा तेजीत झळकत आहेत.