Image Source:(Internet)
मुंबई:
दिवाळीच्या (Diwali) सणांची सुरुवात करणारा धनत्रयोदशीचा दिवस आज, शनिवार, १८ ऑक्टोबर रोजी साजरा होत आहे. आरोग्याचे देवता भगवान धन्वंतरी, तसेच देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची या दिवशी विशेष पूजा केली जाते. या दिवशी नवीन भांडी, झाडू, गणपती आणि देवी लक्ष्मीच्या मूर्तीची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. मात्र, या शुभ दिवशी काही गोष्टींचे पालन न केल्यास वर्षभर आर्थिक आणि मानसिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असा धार्मिक समज आहे.
संध्याकाळी झाडू मारणे टाळा-
धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते, पण संध्याकाळी झाडू मारणे अशुभ ठरते. या वेळी घर झाडल्यास देवी लक्ष्मी नाराज होते आणि घरात दारिद्र्य व दुःख येते, असा समज आहे. त्यामुळे सकाळीच घराची स्वच्छता करून दारासमोरील परिसर स्वच्छ ठेवावा.
दरवाजा बंद ठेवू नका-
धनत्रयोदशीच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते, असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी दरवाजा उघडाच ठेवावा, जेणेकरून देवी लक्ष्मीचे घरात आगमन होऊन सुख-समृद्धी नांदो.
संध्याकाळी मिठाचे किंवा साखरेचे दान टाळा-
धनत्रयोदशीला दान करणे शुभ असते, मात्र संध्याकाळी मीठ किंवा साखर दान करू नये. असे केल्यास देवी लक्ष्मी रुष्ट होते आणि राहूचा प्रभाव वाढतो. परिणामी, घरात आर्थिक अस्थिरता आणि तणाव वाढतो, असे मानले जाते.
पैसे उधार देऊ नका-
या दिवशी पैसे उधार दिल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. पारंपरिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीला पैसे उधार दिल्यास लक्ष्मी आणि कुबेराची कृपा घरावरून निघून जाते. त्यामुळे या दिवशी कोणालाही रोख रक्कम देणे टाळावे.
रिकामी भांडी घरात आणू नका-
धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरी अमृताचे भांडे घेऊन प्रकट झाले होते. त्यामुळे या दिवशी धातूची भांडी खरेदी करणे शुभ, पण रिकामी भांडी घरात आणणे अशुभ मानले जाते. रिकाम्या भांड्यामुळे गरिबी आणि संकटे येतात, असा समज आहे. त्यामुळे भांडी घरी आणताना त्यात थोडे पाणी, गूळ किंवा भात भरून आणावेत.धनत्रयोदशी हा फक्त खरेदीचा दिवस नसून समृद्धी, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. त्यामुळे या दिवशी पारंपरिक नियमांचे पालन केल्यास घरात लक्ष्मी-कुबेराची कृपा लाभते आणि वर्षभर आर्थिक स्थैर्य टिकते, असा धार्मिक विश्वास आहे.