Image Source:(Internet)
नागपूर:
भारतीय जनता पक्षाचे अनुभवी नेते शिवाजी भानुदास कर्डीले (Shivajirao Kardile) यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. वयाच्या ६६ वर्षी हृदयविकाराचा झटका येऊन त्यांची प्राणज्योत मालवली. ते अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते आणि सहाव्या वेळेस या पदावर निवडून आले होते.
कर्डीले यांचे निधन नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात झाले. काही दिवसांपूर्वी ते मोठ्या आजारातून बरे झाले होते, परंतु पहाटे अचानक त्रास वाढल्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांचे निधन जाहीर केले. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, समर्थक आणि स्थानिक राजकीय समुदायात शोककळा पसरली आहे.
शिवाजीराव कर्डीले यांनी आपला राजकीय प्रवास दूध व्यवसायातून सुरू केला आणि गावचे सरपंच म्हणून काम केले. अपक्ष आमदार म्हणून निवडून आले, त्यानंतर भाजपकडून राहुरी विधानसभा मतदारसंघातून २००९ मध्ये विजय मिळवला. २०१४ मध्ये त्यांनी ९१,४५४ मतांनी विजय मिळवला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत जमीन व्यवहार, बांधकाम साहित्य पुरवठा आणि हॉटेल व्यवसायामुळे त्यांची जिल्हाभरात ओळख झाली.
२०१४ च्या निवडणुकीत त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती, मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
शिवाजीराव कर्डीले यांची तीन मुली आहेत. त्यातील एक भानुदास कोतकर यांच्या कुटुंबात, दुसरी अरुण जगताप यांच्या कुटुंबात, तर तिसरी शिवसेनेच्या गाडे परिवारात विवाहाने गेली आहे. अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप आणि माजी महापौर संदीप कोतकर हे त्यांचे जावई आहेत. आता त्यांचा पुत्र अक्षय कर्डीले राजकारणात पदार्पण करून वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेत आहे.