Image Source:(Internet)
छत्रपती संभाजीनगर :
औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं (Aurangabad railway station) नाव आता अधिकृतपणे ‘धर्मवीर छत्रपती संभाजीराजे रेल्वे स्थानक’ करण्यात आलं आहे. या नामांतरासाठी केंद्रीय अधिनियमान्वये महाराष्ट्र शासनाने राजपत्र जारी केलं आहे.
औरंगाबाद शहराचं नामांतर दोन वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं होतं, पण रेल्वे स्टेशनच्या नावात बदल अद्याप झाला नव्हता. अनेक लोकप्रतिनिधींनी आणि स्थानिक नेत्यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचाच परिणाम म्हणून आता राज्य सरकारने केंद्रीय नियम आणि आदेशानुसार स्थानकाचे नाव बदलले आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी या निर्णयासाठी खास पाठपुरावा केला असल्याचा दावा केला. खासदार जाधव म्हणाले, "औरंगाबाद शहरास छत्रपती संभाजीनगर हे ऐतिहासिक नाव देऊनही रेल्वे स्थानकाचं नामांतर पूर्ण झालं नव्हतं. आम्ही सातत्याने शासनाशी संवाद साधत राहिलो आणि पत्रव्यवहार केला. आज आनंदाचा दिवस आहे की, महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमानुसार ‘छत्रपती संभाजीराजे रेल्वे स्थानक’ या नावास मान्यता दिली आहे."
ही नामांतर प्रक्रिया छत्रपती संभाजीराजांच्या तेजस्वी स्मृतींना सन्मान देण्याचा एक महत्त्वाचा पाऊल आहे. लवकरच या स्थानकावर त्यांच्या नावाचं अभिमानाने लोखंडी बोर्ड दिसणार आहे.