Image Source:(Internet)
नागपूर :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुन्हा एकदा सक्रिय राजकीय हालचाली करत आहेत. दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबईत तातडीचा पक्ष बैठकीचे आयोजन केले असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता होणाऱ्या या बैठकीत राज ठाकरे निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाचे निर्णय जाहीर करू शकतात, अशी चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे निवडणूक अधिकाऱ्यांशी सलग भेटी घेत आहेत. मतदारयादीतील दोष आणि विसंगतींबाबत त्यांनी जोरदार भूमिका घेतली आहे. त्यांनी मतदारयादीत गंभीर त्रुटी असल्यास निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्याची मागणी केली होती.विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर राज ठाकरे पक्षाची संघटनात्मक मजबुती करण्यास कटिबद्ध आहेत. अलीकडील बैठकीत त्यांनी बुथनिहाय मतदारयादी तपासणी आणि पदाधिकारी संघटन मजबूत करण्याचे निर्देश दिले होते.
आता रविवारी होणाऱ्या बैठकीत BLA (Booth Level Agents), गटप्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीत निवडणुकीसाठी रणनीती, मतदारसंघनिहाय जबाबदाऱ्या आणि प्रचार मोहिमेची दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे. ठाकरे स्वतः कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील, असे पक्ष सूत्रांनी सांगितले आहे.या तातडीच्या बैठकीमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाशी झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कोणते महत्त्वाचे निर्णय जाहीर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्ष सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत प्रचार धोरणात काही महत्त्वाचे बदल जाहीर होऊ शकतात. ऐन दिवाळीच्या सणात राज ठाकरेंची ‘तोफ’ पुन्हा धडाकेबाज पद्धतीने पडणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.